Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 March 2011

‘ओस्सय ऽऽ ओस्सय’ने पणजी दणाणली

पणजी, दि. २६ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
पणजी शिमगोत्सव समितीने आयोजित केलेल्या शिमगोत्सव कार्यक्रमात आज पारंपरिक लोकनृत्य, रोमटामेळ आणि चित्ररथांनी शोभायात्रा चांगलीच रंगली. ‘घुमचे कटर घूम’ नादात वाजणारे रोमटामेळातील ढोलताशे व ‘ओस्सय ऽऽ ओस्सय’, ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजरात ही मिरवणूक काकुलो आयलॅण्डकडून सुरू झाली व १८ जून रोडमार्गे आझाद मैदानापर्यंत गेली. समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांनी विधिवत पूजन करून यात्रेला प्रारंभ केला.
हजारोंच्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेत फुगडी, गोफनृत्य, धनगरनृत्य अशा विविध पारंपरिक लोककला सादर करणार्‍या एकूण २४ पथकांनी भाग घेतला होता तर वेशभूषा स्पर्धेत एकूण ३१ कलाकारांनी आपली कला पेश केली. पारंपरिक रोमटामेळ आणि घोडेमोडणी सादर करणारी पाच पथके सहभागी झाली होती. तसेच पौराणिक दृश्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून सादरीकरण करणार्‍या एकूण ९ पथकांनी या यात्रेत सहभाग घेतला. केवळ गोमंतकीयच नव्हे तर देशीविदेशी पर्यटकांनीही या शोभायात्रेचा मनसोक्त आनंद लुटला व नृत्य केले. चित्रपट अभिनेते मकरंद अनासपूरे यांची यावेळी उपस्थिती होती. रात्री उशिरा स्पर्धांचा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.

No comments: