मोहालीतील भारत आणि पाकिस्तान दरम्यान विश्वचषकाचाउपांत्य सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यानिमित्ताने भारतात जाणार हे कळल्यापासून पाकमधील प्रसारमाध्यमांत प्रचंड खळबळ माजली आहे. या सामान्यासाठी भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकचे पंतप्रधान गिलानी व राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना आमंत्रित केले आहे. झरदारी यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केलेला नाही. मोहालीतील सामना पाहण्याचे निमंत्रण भारताच्या पंतप्रधानांकडून आल्यापासून पाकमधील प्रसारमाध्यमांत त्याची तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळते. वृत्तवाहिन्यांनी यावर काही टिप्पणी केली नाही, मात्र पाकचे नेते आणि जनतेचे विचार प्रेक्षकांना दाखवणे योग्य मानले. असे असले तरी वृत्तपत्रांनी आपला रोष व्यक्त केला. पंतप्रधान गिलानी यांनी डॉ. सिंग यांचे आमंत्रण स्वीकारल्यापासून पाकच्या वृत्तपत्रसृष्टीचा तिळपापड झाला आहे. काही जणांचे असे म्हणणे होते की, यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरजच नाही. सामान्य पाक नागरिक व क्रिकेटप्रेमी मात्र या मताशी सहमत झाले नाहीत. २९ मार्चच्या (मंगळवारी) उर्दू व इंग्रजी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने यासंबंधीच्या टीकेने भरले आहेत.
पाकिस्तानमधील एक अग्रगण्य दैनिक ‘द नेशन’ने आपल्या संपादकीयाचा मथळा दिला आहे, ‘निमंत्रण आणि कटकारस्थान’. या वृत्तपत्राला डॉ. सिंग यांच्या आमंत्रणामागे मैत्रीची भावना अथवा स्वच्छ हेतू दिसत नाही. डॉ. सिंग यांनी एका तीरातून अनेक बाण मारले असे हे वृत्तपत्र मानते. यातून भारत हे दाखवू इच्छितो की, आपल्याला पाकशी मैत्री ठेवायची आहे, आपल्याला पाकविरुद्ध काहीही तक्रार करायची नाही, उलट हे आमंत्रण स्वीकारले नाही तर, मात्र आम्ही मैत्रीचा हात पुढे केला, तो त्यांनी झिडकारला, आम्ही काय करू शकतो, असे विचारायला भारत मोकळा! पाकने आमंत्रण स्वीकारले तर पाकच्या डोक्यावर उपकाराचे ओझे लादले जाईल आणि म्हटले जाईल की, भारत प्रत्येक वेळी मैत्रीचा हात पुढे करतो. पाकच्या पंतप्रधानांना तेथील माध्यमे काय विचारतील आणि त्यांची कोणती प्रतिमा उभी केली जाईल ही चिंतेची बाब आहे.
काही वर्षांपूर्वी जनरल झिया उल हक यांनी स्वतः पुढाकार घेत जयपूरच्या सामन्याचे आमंत्रण मागितले होते. तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाईंनी त्यांची विनंती मान्य केली. तथापि झिया यांची काय अवस्था झाली हे जगाने पाहिले आहे. भारताने त्यावेळी त्यांना सामान्य क्रिकेटप्रेमीची वागणूक दिली होती. सामान्य माणसाप्रमाणे ते आले आणि गेले. पाकमधील नेत्यांनी आपल्या राष्ट्राभिमानाचा तरी विचार करायला हवा होता. पाकिस्तानने सांगावे की, अशा प्रकारे भारतीय नेते स्पर्धा पाहायला त्या देशात का येत नाहीत? ‘द नेशन’ ने म्हटले आहे की, पंतप्रधान गिलानी यांनी डॉ. मनमोहनसिंग यांचे आमंत्रण स्वीकारून, दोन हसरे चेहरे पुढे आणण्याची संधी दिली आहे. गिलानी जगाला दाखवून देत आहेत की, पाकचे भारताशी जे मतभेदाचे मुद्दे आहे, तो केवळ देखावा आहे. गिलानी यांनी आमंत्रण स्वीकारून या जाळ्यात अडकण्यापूर्वी भूतकाळातील सार्या घटना आठवून पाहायला हव्या होत्या. पाक नेत्यासोबत सामना पाहून दोन देशांमधील संबंध मधूर असल्याचे दाखवण्याची संधी भारतीय नेत्यांना मिळाली आहे, यापलीकडे सदर घटनेला फार महत्त्व नाही. गिलानी यांनी हे आमंत्रण स्वीकारायला नको होते, कारण दोन देशांमध्ये सुरू असलेल्या बोलण्यामध्ये निर्माण झालेले मतभेदाचे मुद्दे दूर होण्याची शक्यताच नाही.
दोन्ही देशांदरम्यानची भांडणे सोडवण्याचा चर्चा हा एकमात्र मार्ग आहे यात शंका नाही. मात्र सध्या इस्लामाबादचा ‘सामना’ एका अशा कटकारस्थानी शेजार्याशी आहे, जो केवळ त्यांच्यावर अतिरेकी कारवायांचा आरोपच करीत नाही तर त्याला अस्थिर बनवून आणि त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याची एकदेखील संधी सोडत नाही. काश्मीरसह कसलाही प्रश्न सोडवण्याचा भारताचा कोणताही इरादा नाही. यात केवळ आपल्याला रस असल्याचा ते देखावा करतात.
‘द नेशन’ने भारताच्या विरोधात काही अपमान करण्यासारखी किंवा शिवराळ भाषा वापरलेली नाही मात्र उर्दू दैनिकांनी सरळ सरळ गिलानींना त्यांना क्रिकेट आवश्यक बाब भासते की, पाकिस्तानचा स्वाभिमान, असा खोचक प्रश्न केला आहे. पंतप्रधानांनी सांगावे की, भारताचा दृष्टिकोन सरळ असता तर झरदारींनी निमंत्रण का स्वीकारले नाही? क्रिकेट सामन्यांतून भारत पाक संबंध चांगले होऊ शकतात तर पाकिस्तानातील संपूर्ण मंत्रिमंडळानेच मोहालीला जावे. दै. ‘नवा ए वक्त’ने, पाक सरकार आम्हाला आणखीन किती वेळा अपमानीत करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. संपूर्ण विश्वात ज्या देशाने पाकिस्तान हा अतिरेकी असल्याचा प्रचार केला आहे, तेथील पंतप्रधान नेहमीच भारतावर पाककडून रोज हल्ले केले जातात, असा आरोप करतात तर मग त्या देशाच्या पंतप्रधानांना आणि राष्ट्राध्यक्षांना आपल्या देशात ते का बोलावतात? पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी भारतापुढे, पाकवर लावलेल्या खोट्या आरोपासंबंधी माफी मागावी व नंतरच आम्हाला भारतात बोलावण्याची हिंमत दाखवावी अशी अट समोर ठेवली असती तर योग्य झाले असते. पाकच्या पंतप्रधानांनी देशातील संपूर्ण जनतेच्या स्वाभिमानावर हल्ला केला, असे लिहिले आहे.
पाकिस्तानातील ‘मुनसिफ’ नामक दैनिकाने हा सामना संपल्यानंतर भारतात सामना पाहायला आलेले अनेक पाकिस्तानी बेपत्ता असल्याचा आरोप भारत करणार असल्याचे म्हटले आहे. ते आपल्या देशात परतलेले नाहीत. म्हणजेच ते खबर्या बनून भारतातच लपले आहेत. भारताचे आरोेप नवे नाहीत. उर्दू माध्यमे रागाने फणफणत असून त्यांनी या निमंत्रणाला एका नवीन षडयंत्राचीच उपमा दिली आहे.
Wednesday, 30 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment