Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 14 March 2011

त्यापेक्षा पीपीपीवर मोपा चालवा

नार्वेकर यांचे सरकारला खणखणीत आवाहन

पेडण्यात पीपीपी विरोधात जाहीर सभा


पेडणे, दि. १३ (प्रतिनिधी)
सरकारने म्हापसा पेडे येथील जिल्हा इस्पितळाचे पीपीपी तत्त्वावर खाजगीकरण करण्याचा जो डाव आखलेला आहे तो जनतेने हाणून पाडावा. जनतेने त्या संदर्भात जर मोर्चा नेला तर आपण जनतेबरोबर येऊन त्याला पाठिंबा देऊ. पीपीपी तत्त्वावर जल्हा इस्पितळचालवण्यापेक्षा मोपा विमानतळ प्रकल्प पीपीपीवर चालवा असे आवाहन हळदोण्याचे आमदार तथा माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनी केले. पेडणे शेतकरी सभागृहात आज (दि. १३) गोवा लोकशाही मंचाने आयोजित केलेल्या सभेत श्री. नार्वेकर बोलत होते. यावेळी सदर सभेस मोठ्याप्रमाणात जनतेचा प्रतिसाद लाभला होता.
व्यासपीठावर यावेळी पेडण्याचे नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, उपनगराध्यक्ष स्मिता कवठणकर, नगरसेवक गजानन सावळ देसाई, नगरसेवक विश्राम गडेकर, युथ कॉंग्रेसचे आशिष खान, पालयेचे सरपंच अर्चना पालयेकर, उपसरपंच कृष्णा नाईक, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, सुनील नाईक, माजी आमदार परशुराम कोटकर, उगवेचे माजी सरपंच संतोष महाले, दिलीप परब, विलास शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
ऍड. नार्वेखर यांनी पुढे सांगितले की, जनतेच्या महत्त्वाच्या आरोग्य व शिक्षण या क्षेत्राबाबत सरकारने कदापिही पीपीपीचा विचार करू नये. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे आरोग्याच्या क्षेत्रात पीपीपीचा अवलंब करू पहात आहेत. यापूर्वी त्यांनी बांबोळी येथील १० हजार चौमी जागा एका इस्त्राईली कंपनीला विकण्याचा डाव आखला होता. तो हाणून पाडला आहे. जिल्हा इस्पितळ बांधण्यास दोन वर्षे लागली पण ते अद्याप सुरू झालेले नाही. मात्र या इस्पितळात३४ डॉक्टर्स, ७४ नर्स व ४० इतर कर्मचारी घेतले असून ते कार्यरत असल्याची सरकारची माहिती आहे. न सुरू झालेल्या इस्पितळात एवढे र्कचारी आहेत हा एक विक्रमच म्हणावा लागेल. असा टोला यावेळी श्री. नार्वेकर यांनी हाणला.
ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेस राज्यकर्त्यांनी आजवर पेडणे तालुका मागास ठेवलेला आहे. मंत्री असूनही विकास होत नाही ही खंत आहे. आज जो मंत्री होतो तो फक्त आपल्या मतदारसंघापुरता होतो संपूर्ण राज्याचा होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. इतर राज्यात वर्षाकाठी लाखो नोकर्‍या उपलब्ध होत असताना गोव्यात मात्र दोन वर्षात सरकारने केवळ दोन हजार नोकर्‍या दिल्या आहेत. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रे लिहिली पण त्याचे उत्तर न आल्याने जनता दरबारात आपण उतरल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी खाण व्यवसायावरही चौफेर टीका केली.
श्री. कोटकर यांनी लोकशाही मंचाला पाठिंबा असल्याचे सांगितले. गोव्यातील भ्रष्टाचार व महागाईविरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही मात्र मंचाने आयोजित केलेल्या या सभेत आपण मुद्दाम आल्याचे ते म्हणाले.
नगराध्यक्ष डॉ. देशप्रभू यांनी पीपीपी तत्त्वावर इस्पितळ चालवण्याचा सरकारचा विचार हाणून पाडा असे आवाहन केले. डॅनियल डिसोझा यांनी राज्यात खाण, पर्यटन व कचर्‍याचे प्रश्‍न तसेच असून पीपीपीवर इस्पितळ चालवणे ही गंभीर समस्या असल्याचे सांगितले. यावेळी दिलीप परब तसेच श्री. खान यांनीही मनोगत व्यक्त केले.
तारामती वस्त, नविता ठाकूर, चैताली शेटकर, अंकिता वस्त, विलक्षा वस्त, दमयंती शेटकर, नीलिमा वस्त यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. अनादिक कला वैभव संस्थेने स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक लक्ष्मण ओटवणेकर यांनी केले. श्री. डिसोझा यांनी आभार मानले.

No comments: