मतमोजणी आजऐवजी उद्या
देऊ बाणावलीकरांच्या जागेवर सेराफिन डायस यांची नियुक्ती
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेसाठी उद्या १३ मार्च रोजी होणार्या निवडणुकीदिवशीच संध्याकाळी मतमोजणी घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मनसुबा पोलिसांच्या पळपुटेपणामुळे रद्द करावा लागला. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी १३ रोजी रात्री मतमोजणीवेळी कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवून या कार्यक्रमात बदल करण्याची विनंती केली आणि एकप्रकारे राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या तयारीवर पाणीच फेरले. आता १३ रोजी होणारी मतमोजणी १४ रोजी सकाळी १० वाजता होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी पत्रकारांशी बोलताना मतमोजणी कार्यक्रमातील बदलाची माहिती दिली. गेले तीन दिवस पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी १३ रोजीचा मतमोजणीचाबेत रद्द करण्याचा रेटा लावत होते. निवडणूक आयोगाने आपला कार्यक्रम एक महिन्यापूर्वीच जाहीर केला होता व त्यादृष्टीने सर्व तयारीही पूर्ण केली होती. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मतदानादिवशीच मतमोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिका निवडणुकीसाठी मतदानयंत्रांचा वापर होणार असल्याने केवळ ४५ मिनिटांत निकाल जाहीर होणार होता. विविध ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स (फलक) उभारून मतदारांना थेट मतमोजणीची माहिती देण्याची सोयसुद्धा करण्यात आली होती. संकेतस्थळावर निकालाची टप्प्याटप्प्याने माहिती देण्यात येणार होती. मात्र, पोलिसांनी ऐनवेळी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केल्याने या सर्व तयारीवर पाणीच फेरले आहे. वेळीच याबाबत कल्पना दिली असती तर ही नसती उठाठेव करावीच लागली नसती अशी प्रतिक्रिया डॉ. मुदस्सीर यांनी व्यक्त केली.
बाणावलीकरांच्या जागेवर डायस
पणजी पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर हे पक्षपातीपणे राजकीय दबावाखाली वावरत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली होती. निवडणूक काळात त्यांची इतरत्र तात्पुरती बदली करण्याच्या मागणीची निवडणूक आयोगाने दखल घेऊन त्यासंबंधी निर्णय घेण्याची शिफारस पोलिस खात्याला केली होती. या शिफारशीची दखल घेऊन बाणावलीकर यांना १४ रोजी मध्यरात्रीपर्यंत फोंडा येथे हलविण्यात आले आहे तर त्यांच्याजागी फोंड्याचे उपअधीक्षक सेराफिन डायस यांची नेमणूक पणजीत करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------
बाबूश यांना हाकलून लावले
बाबूश मोन्सेर्रात, ईजिदोर फर्नांडिस व दोनापावला प्रभागातील त्यांचे उमेदवार हे ‘आयव्हाव’ भागात मतदारांना भेटण्यासाठी फिरत असल्याचा प्रकार भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात आला असता त्यांनी तात्काळ तेथे धाव घेऊन त्यांना हाकलून लावण्याची घटना आज घडली. यावेळी भाजपचे आग्नेलो सिल्वेरा व इतर कार्यकर्ते तसेच बाबूश गट यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेची निवडणूक निरीक्षकांना तात्काळ माहिती देण्यात आली. परंतु ते एक तास उशिरा पोहोचल्याची माहिती सिल्वेरा यांनी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बाबूश व त्यांच्या समर्थकांनी तेथून काढता पाय घेणेच पसंत कले.
Sunday, 13 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment