Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 19 March 2011

भूमिकेत बदल नकोच - वाघ

वाद प्राथमिक शिक्षण माध्यमाचा

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)
‘डायसोसन सोसायटी’ या संस्थेत रोमी कोकणी हीच राजभाषा व्हावी असे मानणार्‍या लोकांचा भरणा आहे, असा आपला सर्वसाधारण समज आहे. मात्र या लोकांनी आता रोमी कोकणीचा ‘मोग’ सोडून इंग्रजीचा जो उदोउदो सुरू केला आहे त्यावरून त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. तथापि, प्राथमिक शिक्षण हे मराठी किंवा कोकणी या मातृभाषांतूनच व्हायला हवे या भूमिकेत अजिबात बदल होता कामा नये, असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, वक्ते, पत्रकार तथा नाटककार विष्णू सूर्या वाघ यांनी केले आहे.
गोव्यात सध्या केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा आधार घेऊन काही घटक गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा घाट घालत आहेत. शिक्षणाचा अधिकार या नव्या कायद्याचा सर्वांगाने अभ्यास न करता ही मंडळी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात ‘प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच’ हा जागतिक सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. मात्र डायसोसन सोसायटीच्या शाळांतील काही पालक आपल्या स्वार्थासाठी याचा अर्थ ‘हव्या त्या माध्यमातून’, असा लावून नव्या वर्षापासून प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून द्या, अशी निवेदने देत आहेत. ही गोष्ट अतिशय धोकादायक आहे असे सांगून या संस्थेला गोव्यातील काही उच्चभ्रू समाजातील लोकांचा छुपा पाठिंबा लाभत असल्याचा दावा त्यांनी केला. उच्चभ्रूंच्या या पाठिंब्यामुळेच स्वतःला ‘कोकणी मोगी’ म्हणवणारे हे लोक गोव्यातून मराठी व कोकणीचे उच्चाटन करण्यास पुढे सरसावले आहेत. सरकारने या लोकांच्या कोणत्याही दबावाला भीक न घातला आपले पूर्वीचेच धोरण सुरू ठेवावे, असेही श्री. वाघ यांनी सांगितले. सरकारने या लोकांच्या दबावापुढे गुडघे टेकून माध्यम बदलण्याचा प्रयत्न केला तर तो आत्मघात ठरेल असा इशाराही विष्णू वाघ यांनी दिला.
गोव्यात सध्या नको असलेल्या गोष्टी घडत असून समाजविघातक शक्तींनी उचल खाल्ली आहे. सरकारने या शक्तींचा वेळीच पाडाव करावा व खंबीर भूमिका घेऊन सर्वसामान्यांच्या मातृभाषेशी होऊ घातलेला हा खेळ थांबवावा, असे आवाहन श्री. वाघ यांनी केले. घेतलेल्या भूमिकेमुळे रोमी कोकणीप्रेमींचा मुखवटा टरटरा फाटला आहे. माध्यमिक शाळेचे माध्यम कोणतेही असो पण प्राथमिक शाळांत मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे हा घटनेने दिलेला अधिकार आहे, याचाही विष्णू वाघ यांनी पुनरुच्चार केला.

No comments: