Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 18 March 2011

‘संपुआ’च्या मानगुटीवर आता विकिलिक्सचे भूत

विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ- पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

- विश्‍वास मतासाठी ‘कॅश फॉर व्होट’चादावा
- लोकदलाच्या चार खासदारांना दिले प्रत्येकी दहा कोटी

नवी दिल्ली, दि. १७
जुलै २००८ मध्ये संपुआ सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाच्या चक्रव्यूहातून वाचविण्यासाठी कॉंगे्रसने राष्ट्रीय लोकदलाच्या चार खासदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्ङ्गोट आज अमेरिकेच्या विकिलिक्स केबलने केला असून, यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा धमाका झाला आहे. अनेक घोटाळ्यांपाठोपाठ आता मानगुटीवर बसलेले हे विकिलिक्सचे भूत उतरविण्यासाठी कॉंगे्रस आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.
भारत-अमेरिकादरम्यान झालेल्या अणुऊर्जा कराराच्या मुद्यावरून डाव्या पक्षांनी संपुआ सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर संपुआला आपले सरकार अजूनही बहुमतात आहे, हे त्यावेळी सिद्ध करण्यासाठी सभागृहात विश्‍वासदर्शक ठराव सादर करावा लागला होता. सरकार अल्पमतात असल्याची जाणीव असल्याने, हा ठराव जिंकण्यासाठी कॉंगे्रसने खासदारांना विकत घेण्याची योजना आखली आणि ही सपूर्ण जबाबदारी पक्षाचे एक नेते सतीश शर्मा यांच्यावर सोपविली. सतीश शर्मा यांनी आपले खास विश्‍वासू आणि राजकीय सचिव नचिकेत कपूर यांच्याकडे हे काम दिले. कपूर यांनी अमेरिकी दूतावासातील एका वरिष्ठ अधिकार्‍याला विश्‍वासात घेऊन कॉंगे्रसची योजना सांगतानाच, खासदारांना खरेदी करण्यासाठी ५० ते ६० कोटी रुपये असलेल्या दोन पेट्या दाखविल्या. अणुकराराचा मार्ग मोकळा करण्यासाठी खासदारांना खरेदी करण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांनी त्यावेळी या अधिकार्‍याला सांगितले. हे संपूर्ण दृश्य आणि त्यांचे संभाषण विकिलिक्सने आज जारी केले.
त्यावेळी हा विश्‍वासदर्शक ठराव सरकारने जिंकला होता. ठरावाच्या बाजूने २७५ आणि विरोधात २५६ मते पडली होती. तर दहा खासदार अनुपस्थित राहिले होते. या खासदारांनी अनुपस्थित राहावे, यासाठीही कॉंगे्रसतर्ङ्गे मोठी लाच देण्यात आली, असा दावाही विकिलिक्सने केला आहे.
२२ जुलै २००८ रोजी लोकसभेत सादर झालेला विश्‍वासदर्शक ठराव कुठल्याही स्थितीत जिंकण्यासाठी कॉंगे्रसची संपूर्ण यंत्रणा पडद्यामागे रात्रंदिवस काम करीत होती. कोणत्या पक्षाचे खासदार खरेदी करता येऊ शकतात, याचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय लोकदलाचे चार खासदार कॉंगे्रसच्या जाळ्यात अडकले. यानंतर कॉंगे्रसने शिवसेनेतील काही खासदारांना विश्‍वासात घेण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसेनेने कॉंगे्रसचा प्रस्ताव नाकारला. लोकदलाच्या खासदारांना कॉंगे्रसने प्रत्येकी दहा कोटी रुपयांची लाच दिली. लाच देण्याची संपूर्ण प्रक्रिया नचिकेत कपूर यांनीच पार पाडली होती. त्यावेळी हा विश्‍वासदर्शक ठराव सरकारने जिंकला होता. ठरावाच्या बाजूने २७५ आणि विरोधात २५६ मते पडली होती. तर दहा खासदार अनुपस्थित राहिले होते. या खासदारांनी अनुपस्थित राहावे, यासाठीही कॉंगे्रसतर्ङ्गे मोठी लाच देण्यात आली, असा दावाही विकिलिक्सने केला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी मात्र या आरोपांचे खंडन करताना, आपल्या पक्षाच्या एकाही खासदाराला एक पैशाचीही लाच मिळाली नसल्याचे सांगितले. आपला पक्ष आधीपासूनच अणुऊर्जा कराराच्या विरोधात होता. त्यामुळे आम्ही संपुआ सरकारच्या विरोधात मतदान केले, असा दावाही अजितसिंग यांनी केला. त्यावेळी आमचे तीनच खासदार होते, असेही अजितसिंग खुलासा करताना म्हणाले.
विश्‍वासदर्शक ठरावाच्या दिवशीच सकाळी नचिकेत कपूर यांनी दूतावासातील अधिकार्‍याची भेट घेतली आणि ‘डील’ निश्‍चित झाली असून, लोकदलाचे चार खासदार प्रत्येकी दहा कोटीवर मानले असल्याची माहिती दिली. त्यांच्यातील हे संभाषणही विकिलिक्सने जारी केले. विश्‍वास दर्शक ठरावाच्या दुसर्‍याच दिवशी अमेरिकन दूतावासातून चर्चेचा हा गोशवारा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला पाठविण्यात आला होता.
‘‘पैशाचा मुळीच प्रश्‍न नाही. पैसा वाट्टेल तितका खर्च करण्याची आमची तयारी आहे. पण, पैसे स्वीकारणार्‍या सदस्यांनी सरकारच्या बाजूने मतदान करायलाच हवे,’’ असे कपूर यांनी या अधिकार्‍याला सांगतानाच त्यांना ५० ते ६० कोटी रुपये असलेल्या दोन पेट्याही दाखविल्या असल्याचे विकिलिक्सने म्हटले आहे.
विकिलिक्सने सतीश शर्मा आणि दूतावासातील अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीचाही हवाला दिला आहे. ‘‘सरकार वाचविण्याच्या कामात मी एकटाच नाही; तर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेतेही यात व्यस्त आहेत. काहीही करून सरकार वाचवायचे, हाच एक ध्यास कॉंगे्रसला लागला आहे,’’ असे शर्मा यांनी या बैठकीत अधिकार्‍याला सांगितले. तर, कॉंगे्रसमधील अन्य एका नेत्याने या अधिकार्‍याला असेही सांगितले की, वाणिज्य आणि उद्योग मंत्री कमलनाथ हेदेखील या कामात मदत करीत आहेत, असे विकिलिक्सने म्हटले आहे.
या अधिकार्‍याला शर्मा यांनी अशीही माहिती दिली की, स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि अन्य वरिष्ठ नेते अकाली दलाच्या आठ खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात अनिवासी भारतीय उद्योगपती संत चटवाल यांची मदत घेतली जात आहे. पण, अकाली दलाच्या खासदारांनी सरकारच्या बाजूने जाण्यास स्पष्ट नकार दिला. सोबतच, शिवसेनेचे सर्व बाराही खासदार मतदानात अनुपस्थित राहावे, यासाठीही प्रयत्न सुरू होते. याशिवाय, भाजपात ङ्गूट पडावी या उद्देशाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य यांनाही पटविण्याचा प्रयत्न झााला. पण, तोही अपयशी ठरला, असेही शर्मा यांनी या अधिकार्‍याला सांगितल्याचे केबलने म्हटले आहे.

कपूरला ओळखत नाही
दरम्यान, सतीश शर्मा यांनी मात्र नचिकेत कपूर असे नाव असलेला आपला कुणीही मित्र नसून, या नावाच्या कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नसल्याचे म्हटले आहे. कपूर यांनीही, आपण कोणत्याच अमेरिकन दूतावासातील अधिकार्‍याला भेटलो नाही आणि सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावाशी आपला काही संबंधही नाही, असा दावा केला आहे.

No comments: