Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 13 March 2011

‘इफ्फी’च्या खर्चाचा डोलारा

वाढता.. वाढता.. वाढे...
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): राज्यात चित्रपट संस्कृती रुजण्यास ‘इफ्फी’चा कती उपयोग होतो यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. मात्र, काही महाभागांसाठी ‘इफ्फी’ महोत्सव सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरली आहे. गेल्या वर्षीच्या ‘इफ्फी’साठी साडेसहा कोटी रुपयांची तरतूद करूनही प्रत्यक्ष खर्चाचा आकडा नऊ कोटी रुपयांवर पोहोचल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हा अनियंत्रित व अवाढव्य खर्च कमी म्हणून की काय या महोत्सवात दारूकामाची आतषबाजी, विद्युतरोषणाई आदींवर ४४ लाख तर किरकोळ खर्चाच्या नावे १ कोटी रुपये फस्त करण्यात आल्याचीही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) कार्यकारी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच संपन्न झाली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष जलस्त्रोत्रमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, विष्णू सूर्या वाघ, फ्रान्सिस मार्टिन्स, विशाल पै काकोडे, मांगिरीश पै रायकर, धर्मानंद वेर्णेकर, ‘ईएसजी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. २०१०-११ च्या इफ्फी खर्चाला मान्यता देण्याबरोबरच २०११-१२ च्या इफ्फी खर्चाच्या अंदाजपत्रकाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘इफ्फी’ आयोजनावर मोठ्या प्रमाणात अनाठायी खर्च होत असल्याची राळ स्थानिक चित्रपट निर्माते तथा इतर संस्था उठवत असतानाच यंदा साडेसहा कोटी रुपयांच्या खर्चमर्यादेचे उल्लंघन करून नऊ कोटी रुपयांची उधळण ‘इफ्फी’वर कशी काय झाली, असा सवाल अनेकांना सतावत आहे.
‘इफ्फी’ आयोजनाची विविध कंत्राटे मिळवण्यासाठी मनोरंजन संस्थेच्या कार्यकारी मंडळातील काही पदाधिकार्‍यांची भूमिका या खर्चाच्या अनुषंगाने चर्चेत आली आहे. ‘इफ्फी’ आयोजनासाठी राष्ट्रीय चित्रपट संचालनालयाकडून फक्त २२ लाख रुपये मंजूर झाले व त्यातील १८ लाख रुपये ‘ईएसजी’ च्या खात्यात जमा झाले आहेत. हे पैसे देखील कलाकार तथा अतिमहनीय व्यक्तींच्या आदरातिथ्यावर खर्च झाल्याचे दाखवण्यात आल्याचे कळते. केंद्र सरकारकडून या महोत्सवाच्या खर्चाचा काही वाटा उचलला जाणार असे जे सांगितले जात होते, त्याचाही पर्दाफाश यानिमित्ताने झाला आहे. महोत्सवात हॉटेलची निवड करण्यावरून निर्माण झालेला गोंधळ सरकारला बराच महागात पडला. किनारी पंचतारांकित हॉटेल निवासस्थानावर दोन कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहितीही समोर आली आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात राज्य विधानसभा अधिवेशनात आमदार दयानंद मांद्रेकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर, यंदाच्या इफ्फीच्या खर्चाचा आकडा ४ कोटी ८६ लाख ४५ हजार ४९७ रुपये एवढा दाखवण्यात आला होता, मात्र हिशेब पूर्ण केल्याअंती तो ९ कोटींच्या घरात पोहोचला आहे. एकीकडे स्थानिक चित्रपट निर्मात्यांना आर्थिक साहाय्य देण्यास सरकार हात आकडते घेते आहे. चित्रपटनिर्मिती अनुदान योजनेचाही बोजवारा उडाला आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही ‘इफ्फी’चा प्रत्यक्षात राज्याला किती फायदा होतो याचा नव्याने पुनर्विचार करण्याचीच वेळ आता येऊन ठेपली आहे.
मनोरंजन संस्थेचा डोलारा ढासळला
गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे राज्याचे मनोरंजन धोरण निश्‍चित करणे, इफ्फी आयोजनाची पूर्ण जबाबदारी स्वीकारणे व ‘फिल्म-सीटी’ प्रकल्प उभारून स्थानिक चित्रपट निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देणे. पण या संस्थेच्या कारभारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारपदी मनोज श्रीवास्तव यांची झालेली नियुक्तीच वादाचा मुद्दा ठरली आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून बहुतांश कर्मचारी काम सोडत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सध्या फक्त कंत्राटी कर्मचार्‍यांचाच भरणा संस्थेत करण्यात आल्याने संस्था मूळ उद्दिष्टापासून दुरावत चालली आहे. संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य सभापती प्रतापसिंह राणे, अंजू तिंबले, रंजना साळगावकर, आमदार चंद्रकांत कवळेकर आदींची बैठकीला अनुपस्थिती होती. केवळ पंधरा ते वीस मिनिटांत ही बैठक आटोपती घेण्यात आल्याने कुणीही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत नाही अशीच आता मानसिकता बनली आहे. गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्‍या ‘इफ्फी’साठी ९.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यंदाच्या खर्चाचा आलेख पाहता हा खर्च १५ कोटी रुपयांच्या घरात तर पोहोचणार नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-----------------------------------------------------------------
२०१० च्या ‘इफ्फी’वर ९ कोटींची उधळण
आयोजन खर्च - ४८ लाख ९५ हजार
यंत्रसामग्री भाडे खर्च - ४१ लाख १० हजार
प्रवास खर्च - २ कोटी ६ लाख
छपाई व लेखनसामग्री - ८१ लाख ३५ हजार
पंचतारांकित निवासव्यवस्था - २ कोटी ७ लाख
दारूकामाची आतषबाजी व विद्युतरोषणाई - ४४ लाख ४५ हजार
किरकोळ खर्च - १ कोटी १ लाख

No comments: