पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
आज संध्याकाळी अचानक घडलेल्या एका राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार तथा महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. दि. १६ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अचानकपणे घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे आघाडीत काही प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार, जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांनी विकासाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांतसरकारच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करून आपापले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याचे सांगितले. श्री. सिरसाट यांना यापूर्वीच दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. आज जुझे फिलिप व नीळकंठ हळर्णकर यांना पाचारण करून त्यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. या राजीनाम्यांवर शरद पवार हे पक्षाचे इतर वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करणार आहेत व मगच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी कळवले आहे.
जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांनी यापूर्वी पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्याचा आदेश धुडकावून लावत पक्षश्रेष्ठींकडील संपर्कच तोडला होता. मध्यंतरी जुझे फिलिप डिसोझा यांच्याकडील विधिमंडळ नेतेपद व नीळकंठ हळर्णकर यांच्याकडील मुख्य प्रतोदपद काढून घेण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश समितीने घेऊन तो सभापती प्रतापसिंग राणे यांच्याकडे सादर केला होता. याप्रकरणी सभापती राणे यांनी आपला निकाल राखीव ठेवला आहे. पक्षविरोधी कोणतीही भूमिका अथवा वक्तव्य केले नाही व पक्षशिस्तीचेही कोणतेही उल्लंघन केले नाही, अशी माहिती या व्दयींनी शरद पवार यांना दिल्याची खबर आहे. राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, अशी हमी देखील या नेत्यांनी शरद पवार यांना दिल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, या दोन्ही मंत्र्यांना दिल्लीत पाचारण करून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर करण्यामागे कोणती राजकीय व्यूहरचना आहे हे गुपित मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मंत्रिपदासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे जबरदस्त लॉबींग केलेले मिकी पाशेको यांना या घटनेबाबत काहीच माहिती नसल्याने त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. मिकी पाशेको यांच्या मंत्रिपदावर कोणताही तोडगा निघाला नाही व त्यामुळे ते नाराज असून आपल्या काही समर्थकांसोबत ते पक्षत्याग करण्याच्या तयारीत असल्याचीही खबर असल्याने त्या बाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
दरम्यान, १६ रोजीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांनी दिलेल्या राजीनामा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देण्यात आल्याने त्याचा सरकारवर कोणताच परिणाम होणार नाही तसेच या मंत्र्यांना अधिवेशनात भाग घेण्यापासून काहीही बंधने नसतील. या उभय मंत्र्यांची मंत्रिपदे कायम ठेवून पक्षश्रेष्ठींकडून त्यांना माफी करण्याचीच शक्यता जास्त असून हे राजीनामा नाट्य केवळ पक्षशिस्तीचा एक भाग असल्याचेही सांगण्यात येते.
Tuesday, 15 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment