Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 13 March 2011

स्वामी बॅनेगेला यांचे गोव्यात आगमन

वास्को, दि. १२ (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र कुंडई तपोभूमी येथे उद्या रविवार दि. १३ मार्च रोजी प. पू. श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचा जन्माष्टमी सोहळा व गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी श्रीलंका महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष तथा जपानचे बुद्धसंघ नायक श्रीमान बॅनेगेला उपतिस्सा नायक थेरो यांचे आज दाबोळी विमानतळावर आगमन झाले. तपोभूमीचे पीठाधीश प. पू. श्री ब्रह्मेशानंद स्वामी आणि गुरूमाउली श्री ब्राह्मी देवी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी पद्मनाभ संप्रदायाचे अध्यक्ष रामचंद्र नाईक, सुरेश परब यांची उपस्थिती होती.
जपान येथे घडलेली महाभयंकर घटना सर्वांसाठी वेदनादायक आहे. जपान देशात आमचा आश्रम असून तेथे असलेल्या आमच्या लोकांची चौकशी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र अजून संपर्क झालेला नाही अशी माहिती श्रीमान थेरो यांनी दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना श्रीमान थेरो यांनी गोव्यात आल्याचा आपल्याला आनंद होत असल्याचे सांगितले. उद्याच्या कार्यक्रमातून बौद्ध व हिंदू धर्माचा आणखीन चांगल्या पद्धतीने प्रचार होणार असल्याचे ते म्हणाले.
श्रीमद् सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामींनी श्रीमान थेरो यांच्या आगमनाबाबत आनंद व्यक्त करून उद्याच्या कार्यक्रमात त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात गोव्यातील सर्व ४० आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments: