• आज मतमोजणी • मतदारांत उत्साह • अनुचित प्रकार नाही
प्रभाग १५ मध्ये सर्वाधिक तर प्रभाग ४ मध्ये सर्वांत कमी मतदान
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
राज्यातील एकमेव पणजी महापालिका निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या उर्त्स्फूत प्रतिसादामुळे ७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. प्रत्येक प्रभागातील लढत अत्यंत चुरशीची ठरेल, असा होरा असून मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेल्या पणजीकरांचा कल नेमका कुणाच्या पारड्यात पडेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या १४ रोजी सकाळी १० वाजता फार्मसी महाविद्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार असून एका तासात निकाल स्पष्ट होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदास्सीर यांनी दिली.
पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलचा विजय निश्चित असल्याचा दावा करून पॅनलला स्पष्ट बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला तर पणजी विकास आघाडीचे उमेदवार तथा माजी उपमहापौर यतीन पारेख यांनी चक्क विजयोत्सवच साजरा करून पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनलचा झेंडा फडकेल, असाच दावा केला आहे. सर्वाधिक मतदान ८७.१३ टक्के प्रभाग १५ (आल्तिनोे) येथे तर सर्वांत कमी मतदान ५९.०३ टक्के प्रभाग ४ (करंजाळे)े येथे नोंद झाले. काही ठिकाणी क्षुल्लक घटना वगळता पोलिसांनी सुरक्षेची चोख व्यवस्था केल्याने मतदान अत्यंत मोकळ्या व निर्भय वातावरणात पार पडले.
एकूण ३२०९० मतदारांपैकी २३९६९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक १२२८५ महिला मतदारांनी मतदान केले तर ११६८४ पुरुष मतदारांनी मतदानात भाग घेतला. प्रभाग ७ मध्ये ३९२ पुरुष व ३९२ महिलांनी समान मतदान केल्याचीही नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान झालेल्या प्रभाग १५ मध्ये दुरंगी लढत असून माजी नगरसेवक मंगलदास नाईक यांच्यासमोर पणजी फर्स्टचे युवा उमेदवार शेखर डेगवेकर यांनी जबरदस्त आव्हान निर्माण केले आहे. सर्वांत कमी मतदान झालेल्या प्रभाग ४ मध्ये माजी महापौर कॅरोलिना पो व प्रभाकर डोंगरीकर यांच्यात ‘काटें की टक्कर’ अपेक्षित आहे.
सकाळपासूनच बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. मतदानयंत्रांचा वापर व त्यात प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदानयंत्रांची व्यवस्था करण्यात आल्याने जादा वेळ रांगेत उभे राहण्याची तसदी मतदारांना घ्यावी लागली नाही. मतदानासाठी येणार्या प्रत्येक मतदाराचे छायाचित्रिकरण करण्यात येत असल्याने तो एक नवा अनुभव मतदारांना घ्यायला मिळाला. दुपारी २ वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ज्येष्ठ नागरिक तथा युवा मतदारांनीही मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडून आपला उत्साह दाखवला. दुपारचे एक दोन तास मतदान काही प्रमाणात रोडावले असले तरी संध्याकाळी मात्र मतदानास पुन्हा जोर चढला. एकूण ९ प्रभागांत ८० टक्क्यांच्या वर मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढल्याने त्याचा फायदा पणजी फर्स्ट पॅनलला होणार असल्याचा विश्वास या पॅनलच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे तर कुणी कितीही दावे केले तरी पणजी महापालिका बाबूश मोन्सेरात यांच्याकडेच राहील, अशा आत्मविश्वास बाबूश समर्थक गटाने केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत ‘टूगेदर फॉर पणजी’ व अपक्ष उमेदवारांत काही प्रमाणात नैराश्य पसरल्याचे दिसत असले तरी अपक्ष उमेदवार सुरेंद्र फुर्तादो व त्यांच्या पत्नी रूथ फुर्तादो यांची लढत रंगतदार ठरणार असल्याचेही बोलले जाते.
पणजी महापालिकेसाठी झालेले प्रभागवार मतदान पुढीलप्रमाणे -
प्रभाग- पुरुष - महिला - एकूण मतदान - टक्केवारी
१ ४४३ ४८९ ९३२ ७१.८०
२ ३९७ ४६० ८५७ ८१.७०
३ ४९३ ५४२ १०३५ ६६.२६
४ ४६४ ५३९ १००३ ५९.०३
५ ४५५ ४८४ ९३९ ६७.०७
६ ३३७ ३९४ ७३१ ६८.१९
७ ३९२ ३९२ ७८४ ७४.१७
८ ४५० ४७९ ९२९ ७८.४६
९ ३१३ ३२० ६३३ ७०.६५
१० २७५ ३१४ ५८९ ७६.८९
११ २७७ ३०६ ५८३ ७३.०६
१२ ३४७ ३६८ ७१५ ७६.२३
१३ ३६५ ३९१ ७५६ ७३.४०
१४ ४२६ ४४२ ८६८ ८३.१४
१५ ३९३ ३५२ ७४५ ८७.३४
१६ ५१३ ५२१ १०३४ ७०.५८
१७ ४३० ४२० ८५० ८२.१३
१८ ३८० ३४९ ७२९ ७८.८१
१९ ३४७ ३५९ ७०६ ७९.८६
२० ३४९ ३७६ ७२५ ८५.९०
२१ ३४१ ३०५ ६४६ ८३.२५
२२ ३६७ ३२३ ६९० ७४.६८
२३ ४०४ ४५७ ८६१ ८०.६९
२४ ३८५ ४१५ ८०० ८३.९५
२५ ४२३ ४०१ ८२४ ६७.७१
२६ २८२ २९९ ५८१ ६४.६३
२७ ३२४ ३५७ ६८१ ८२.६५
२८ २११ २३२ ४४३ ६६.२२
२९ ४९६ ५३९ १०३५ ७७.३०
३० ६०५ ६६० १२६५ ७७.९४
Monday, 14 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment