जहाज कापण्यास सुरुवात
म्हापसा, दि. १४ (प्रतिनिधी)
गेल्या अकरा वर्षांपासून कांदोळी किनार्यावर रुतून पडलेले आणि या सबंध किनारपट्टीलाच धोका निर्माण केलेले रिव्हर प्रिन्सेस जहाज अखेर हटवण्याचे काम आज सोमवारपासून सुरू झाले आहे. अरिहंत शिप ब्रेकिंग कंपनीने आज संध्याकाळपासून सदर जहाज कापण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
सुमारे २०४० मीटर लांब आणि २६ मीटर रुंद असलेले हे साळगावकर खाण कंपनीच्या मालकीचे जहाज गेल्या अकरा वर्षांपासून कांदोळी समुद्रकिनारी रुतून पडले होते. सदर जहाज हटवण्यासाठी सरकारने अनेकदा निविदा मागवल्या होत्या. परंतु, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव जहाज हटवण्याचे काम मात्र सुरू झाले नव्हते. विरोधकांनी आणि नागरिकांनीही या प्रकरणावरून सरकारवर बरेच ताशेरे ओढले होते. शेवटी अरिहंत या कंपनीने हे जहाज हटवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि आणि सर्व सोपस्कार पूर्ण करून अखेर आज हे जहाज कापण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.
आज काम सुरू करताना उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन, स्थानिक आमदार आग्नेल फर्नांडिस, पर्यटन खात्याचे संचालक स्वप्निल नाईक, अरिहंतचे चेअरमन आशिष जैन, कांदोळीचे सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, बोेट कापण्याचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी जहाजाचा वरचा भाग काढण्यात येईल व पावसाळ्यानंतर राहिलेला भाग हटवण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Tuesday, 15 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment