Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 16 March 2011

राष्ट्रीय बँका आणि सहकारी पतसंस्थांना करोडोंना गंडा घालणारा फोंड्यातील ठकसेन जेरबंद

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
विविध राष्ट्रीय बँका आणि सहकारी पतसंस्थांना करोडो रुपयांना गंडा घालणारा फोंडा शहरातील ‘ठकसेन’ विश्‍वेष अनिल सिरसाट याला आज केंद्रीय गुन्हा अन्वेषणाने (‘सीबीआय’) कोल्हापूर येथून अटक केली. संशयित सिरसाट याने कर्ज काढून शिरदोण बांबोळी येथील कॅनरा बँकेला सुमारे १ कोटी रुपयांची टोपी घातली आहे. या प्रकरणात बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक ए. एस. पै यांचाही सहभाग असून त्यांचीही चौकशी केली जात असल्याचे सीबीआयने सांगितले. विश्‍वेष सिरसाट याला आज विशेष न्यायालयात हजर करून दि. २१ मार्च पर्यंत कोठडीत घेण्यात आले आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित अद्याप फरार असल्याचे ‘सीबीआय’ने सांगितले.
अधिक माहितीनुसार, संशयित सिरसाट हा याच कॅनेरा बँकेत नोकरीला होता. तेव्हा त्याने विविध बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून करोडो रुपयांचे कर्ज काढले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यावेळी बँकेचे व्यवस्थापक श्री. पै यांची पदावनती करून त्यांची बदली गुजरातमध्ये करण्यात आली होती. सिरसाट याने राज्यातील अनेक राष्ट्रीय बँकांतून तसेच, सहकारी पतसंस्थांतूनही करोडो रुपयांचे कर्ज घेतले आहे.
मार्च २०१० मध्ये या प्रकरणाची गोव्यातील सीबीआयने नोंद केली होती. तेव्हापासून संशयित सिरसाट हा फरार होता. तो कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री त्याला सीबीआयने अटक करून गोव्यात आणले. तर, गुजरात येथून श्री. पै यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले.

No comments: