लाखो रुपयांची उधळण होणार, संगीत रजनी व शाही मेजवानीचा बेत
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)-
२०१० सालच्या ‘इफ्फी’वर नऊ कोटी रुपयांची वारेमाप उधळण केलेल्या गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) आता आपल्या ७ व्या वर्धापनदिनाचा मुहूर्त शोधून काढत सरकारी तिजोरीला २० लाख रुपयांचा फटका देण्याची आणखी एक ‘अभिनव’ योजना आखली आहे. या सोहळ्यानिमित्त योगी एंजल व समूह या विदेशी कलाकारांची संगीत रजनी व शाही मेजवानी देण्याचा खटाटोप संस्थेने चालवला आहे. अलीकडेच संस्थेच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
‘ईएसजी’ संस्थेचा ७ वा वर्धापनदिन ६ मे २०११ रोजी ‘आयनॉक्स’ परिसरात मोठ्या थाटात साजरा करण्याचा प्रस्ताव संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनोज श्रीवास्तव यांनी प्रशासकीय समितीच्या बैठकीसमोर ठेवल्याची खबर प्राप्त झाली आहे. या सोहळ्यात संस्थेची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, प्रतापसिंह राणे, संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिगीस व नंदिनी पलिवाल, स्थानिक चित्रपट निर्माते लक्ष्मीकांत शेटगावकर व राजेंद्र तालक तसेच चित्रपट इतिहास संशोधक बी. डी. गगर्र् यांचा सत्कार होणार आहे.
दरम्यान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवा प्रशासकीय समितीच्या बैठकीत कार्यक्रम पत्रिकेवरील वर्धापनदिनाचा विषय ८ व्या क्रमांकावर होता. हाच विषय ‘ईएसजी’च्या २१ फेब्रुवारी २०११ रोजी झालेल्या ५४ व्या कार्यकारी बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर १७ क्रमांकावर होता. या बैठकीतही सदर विषयावर चर्चा करण्यात आली. सोहळ्यानिमित्त गोव्यातील नामवंत नृत्य व गायक कलाकारांना सामावून घेऊन एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मॅकेनीझ पॅलेस येथे आयोजित करण्याचे बैठकीत ठरले होते. एवढे असूनही ‘सीईओ’ मनोज श्रीवास्तव यांच्याकडून संगीत रजनी व शाही मेजवानीचा २० लाख रुपयांचा नवा प्रस्ताव प्रशासकीय समितीच्या बैठकीत सादर होतो व त्याला मान्यता देण्यात येते या प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘ईएसजी’ कारभाराच्या एकापेक्षा एक सुरस कथांची चर्चा सुरू असतानाच आता वर्धापनदिनाच्या या भव्य योजनेचीही भर पडली आहे. मनोज श्रीवास्तव यांची वादग्रस्त नियुक्ती व त्यांचा एकूणच कारभार यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याने त्यांना प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकार्यांची साथ असल्याचेही आता उघडपणे बोलले जात आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडूनही ‘ईएसजी’ला रान मोकळे सोडण्यात आल्याने इथे सर्वत्र ‘मनो(ज)रंजक’ कारभारच सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते.
Wednesday, 16 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment