Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 14 March 2011

फोंडा पोलिस स्थानकावर पंचवाडीवासीयांचा मोर्चा

• खाण समर्थकांविरुद्ध दहशतीची तक्रार

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी)
पंचवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सेझा गोवा कंपनीच्या नियोजित बगल रस्ता आणि बंदर प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी खाण कंपनीच्या समर्थकांकडून प्रकल्पाला विरोध करणार्‍या लोकांना धमकावण्याचे सत्र सुरू करण्यात आल्याचा आरोप पंचवाडी बचाव समितीकडून केला जात आहे. पंचवाडी गावातील कथित दहशतीच्या वातावरणाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी आज (दि.१३) सकाळी फोंडा पोलिस स्थानकावर मोर्चा आणून याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शनिवार १२ मार्च रोजी दुपारी काही खाण प्रकल्प समर्थकांनी आपल्या घरी चालत जाणार्‍या काही स्थानिक शालेय युवतींना वाटेत अडवून त्यांना दमदाटी केल्याचा आरोप पंचवाडी बचाव समितीने केला आहे. या दमदाटीप्रकरणी एक तक्रार रविवार १३ मार्च रोजी सकाळी फोंडा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. ज्योकीम कार्व्हालो नामक व्यक्तीने वाट अडविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गेल्या ११ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी पंचवाडी गावातील विरोध होत असलेल्या बगल रस्त्याची पाहणी केल्यानंतर पंचवाडी गावातील खाण समर्थक आणि विरोधकात संघर्षाला सुरुवात झाली आहे. नियोजित रस्ता व बंदर प्रकल्पावरून गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. काही खाण समर्थकांकडून ह्या प्रकल्पाला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, अशी पंचवाडी बचाव समितीची तक्रार आहे. या समितीच्या पदाधिकार्‍यांनी येथील फोंडा पोलिस स्थानकाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन गावात निर्माण केल्या जाणार्‍या दहशतीची माहिती दिली आहे. बांधकाम मंत्री आलेमाव पंचवाडी गावात आले आणि लोकांची भांडणे लावून निघून गेले, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
१२ मार्च रोजी स्थानिक युवतींना वाटेत अडवून त्यांना दमदाटी करण्यात आल्याने लोकांत पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे. ह्या दमदाटी प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ रविवारी (दि.१३) सकाळी मोठ्या संख्येने फोंडा पोलिस स्थानकावर आले होते. पंचवाडी गावात दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या लोकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दमदाटी प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय दळवी तपास करीत आहेत.
दरम्यान, पंचवाडी गावातील गेल्या ११ मार्च रोजी माराहाण करण्यात आलेल्या महिला व त्यानंतर १२ मार्च रोजी दमदाटी करण्यात आलेल्या शालेय युवती ह्या अनुसूचित जमातीतील असल्याने उटा ह्या संघटनेने ह्या घटनेचा निषेध केला आहे. समाज बांधवावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा उटाने दिला आहे.

No comments: