भ्रष्टाचारी नेत्यांना पळता भुई थोडी..
कैरो, दि. २९ : इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, जॉर्डन यासारख्या आखाती आणि आङ्ग्रिकी मुस्लिम देशांमध्ये तरुणांनी तेथील एकाधिकारशाही आणि माजलेल्या भ्रष्ट नेत्यांना विरोध करण्यासाठी हिंसक क्रांती सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात हे लोण अन्य आशियाई देशांत पोहोचले तर आश्चर्य वाटू नये.
इजिप्त ः उत्तर आङ्ग्रिकेतील इजिप्तमध्ये राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या भ्रष्ट कारभाराला जोरदार विरोध होत आहे. तरुणांनी रस्त्यावर येऊन हिंसक पद्धतीने राष्ट्रपती आणि सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलिस आणि जनता यांच्यातील संघर्षात ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मरण पावले आहेत. ठिकठिकाणी नेत्यांचे पोस्टर जाळणे, सरकार विरोधी घोषणाबाजी करणे, सरकारी आस्थपनांवर हल्ले करणे अशा कारवाया सुरूच आहेत.
राष्ट्रपती मुबारक यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात शांततेचे आवाहन केले आहे. सरकार बरखास्त करणार्या राष्ट्रपतींनी स्वतः राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र हे करताना खबरदारीचा उपाय म्हणून या गृहस्थांनी स्वतःच्या सर्व जवळच्या नातलगांची रवानगी इंग्लडला केली आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष नोबेल विजेते मोहम्मद अल बारदेई यांनी होस्नी मुबारक राजवटीविरुद्ध आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी मोहम्मद अल बारदेई आणि त्यांच्या सहका-यांनी मारझोड केली तरी राष्ट्रपती विरोधी आंदोलन थंड पडलेले नाही. इजिप्तच्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मुबारक यांच्याविरुद्धच्या आंदोलनाने जोर पकडला आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरकड सुरू केली आहे. प्रशासनाने मोबाइल तसेच इंटरनेट सेवा बंद केली आहे. मोहम्मद अल बारदेई यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. देशातील सर्व संवेदनशील ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे.
ट्युनिशिया ः राष्ट्रपती जॉईल अल अबीदीन यांच्या भ्रष्ट कारभाराचा विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. गेल्या २३ वर्षांपासून सत्तेवर ठाण मांडून बसलेले राष्ट्रपती अबीदीन यांनी चालवलेला मनमानी थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे लोकांनी ठरवले आहे.
डिसेंबरमध्ये एका बेरोजगार तरुणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याचा चार जानेवारी रोजी मृत्यू झाला आणि अबीदीन प्रशासनाविरुद्ध जनतेतून संतापाचा विस्फोट झाला. स्थिती इतकी चिघळली की, अबीदीन यांनी देश सोडून थेट सौदी अरेबियात राजकीय आश्रय घेतला आहे. राष्ट्रपतींच्या पत्नी दीड टन सोने घेऊन देशातून पळून गेल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोहम्मद घानोची यांनी नव्याने सरकार स्थापन करून तब्बल १२ नव्या कॅबिनेट मंत्र्यांची सोबत घेत देश सावरायचे प्रयत्न सुरू केले आहेत.
येमेन ः गेल्या ३२ वर्षांपासून येमेनमध्ये अनभिषिक्त सम्राटासारखे सत्ता उपभोगत असलेल्या राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या विरोधात ठिकठिकाणी दंगली उसळल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी सरकार आणि नागरिक यांच्यातच तीव्र संघर्ष सुरू आहे. मात्र अद्याप राष्ट्रपतींनी नागरिकांची बाजू ऐकून कोणतेही परिवर्तन केलेले नाही. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा खास दोस्त असलेल्या येमेनमध्ये सुरक्षा पथकांच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Sunday, 30 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment