Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 4 February 2011

प्रभू मोनी यांच्या घरी पन्नास लाखांची चोरी

सुरक्षा रक्षकास बंगळूरमध्ये अटक

पर्वरी, दि. ३ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी तथा उद्योजक व्यंकटेश प्रभू मोनी यांच्या पर्वरी येथील बंगल्यातील तब्बल ५० लाखांचा ऐवज त्यांच्याच सुरक्षा रक्षकाने चोरून नेल्याची घटना काल दि. २ रोजी घडली. दरम्यान, उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बंगळूर येथे ऋषिवंत सिंग (२५, मणिपूर) या सुरक्षा रक्षकास व रामानंद सिंग, के. एच. मधुमंगल, आणि राकेश सिंग या त्याच्या अन्य तिघा साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची तुकडी बंगळूरला रवानाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सविस्तर वृत्त असे की, व्यंकटेश प्रभू मोनी एक पुरस्कार स्वीकारण्यासाठी चार दिवसांपूर्वी बँकॉकला गेले होते. ते दि. २ रोजी सायंकाळी परतले. मात्र त्यापूर्वी संधी साधून सुरक्षा रक्षक ऋषिकांत सिंग याने कपाटातील तिजोरी तोडून आतील सोन्याचे, हिर्‍याचे दागिने आणि रोख ५० हजार असा ऐवज लुटून नेला. यासंबंधी पर्वरी पोलिस स्थानकात प्रभू मोनी यांनी काल रात्री ११ वा. तक्रार केली होती. लगेच निरीक्षक देवेंद्र गाड पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी गेले. त्यांनी रीतसर पंचनामा करून सदर सुरक्षा रक्षकाचा माग काढण्यासाठी कळंगुट येथील त्याच्या सहकार्‍यांच्या घरी धाड घातली. परंतु, तेथे तो सापडू शकला नाही. घटनास्थळी श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञालाही पाचारण करण्यात आले. सदर सुरक्षा रक्षक गेली ४ वर्षे मोनी यांच्याकडे कामाला होता. उत्तर गोवा अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक पंढरीनाथ मापारी, निरीक्षक देवेंद्र गाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश गडेकर पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, चोरटे बंगळूरला असल्याचा सुगावा पोलिसांना प्रभू मोनी यांचा मुलगा शुभम याच्या हुशारीमुळे लागला. चोरांनी काल दुपारी १२ वा. शुभमला फोन केला असता त्याने त्यांना काहीच घडल्याचे भासवले नाही व संभाषण सुरूच ठेवले. यामुळेच पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कळू शकला.

No comments: