Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 3 February 2011

खनिजवाहू ट्रक व बसच्या टकरीत २१ प्रवासी जखमी

नावेली - सुर्ल येथील घटना, मोठा अनर्थ टळला

पाळी, दि. २ (वार्ताहर)
नावेली - घोडबांय आणि सुर्ल ग्रामपंचायत यांच्या दरम्यान असलेल्या उतारावर आज सकाळी ८.३०च्या सुमारास भरधाव वेगाने खनिज मालाची वाहतूक करणारा टिप्पर ट्रक व प्रवासी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीत बसमधील २१ प्रवासी जखमी झाले. सदर बस कलंडता कलंडता सावरल्यामुळे मोठा अनर्थ टळला; अन्यथा जीवितहानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, साखळी कदंब बस स्थानकावरून ८ वा. प्रवाशांना घेऊन फोंड्याकडे निघालेली ‘रेणुका’ नामक जीए-०१-यू- २२२८ या क्रमांकाची बस सुर्ल येथील चढावावर जीए-०८-यू-००१७ या ट्रकाच्या मागोमाग जात होती. याच वेळी खनिज माल भरून सुर्ल ग्रामपंचायतीकडून नावेली येथे भरधाव वेगाने येत असलेल्या जीए -०४-टी-१२४० या क्रमांकाच्या टिप्पर ट्रकाने आधी समोेरून येणार्‍या ट्रकाला धक्का दिला. त्या धक्क्यामुळे रस्त्याच्या बाहेर जाऊ पाहणार्‍या ट्रकाला सावरण्याच्या प्रयत्नात त्याने मागून येणार्‍या रेणुका बसच्या दर्शनी भागालाच सरळ जोरदार धडक दिली. या धक्क्याने बस एका बाजूला कलंडता कलंडता वाचली. बस कलंडली असती तर जीवितहानी होऊन मोठा अनर्थ घडला असता, असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.
दरम्यान, सुदैवाने हा अनर्थ टळला असला तरी ट्रकाच्या धडकेने बसचा चालक आणि वाहक यांच्यासह २१ प्रवासी जखमी झाले. यात लक्ष्मी सावंत (४०), तुळशी चंद्रकांत सावंत (२७), सुदेश सूर्या सावंत (१३) (सर्व सावंतवाडा, पर्ये), बिंदीया बाबली सावंत (२४), लीला विनोद ओतारी (२४), हेमंत सदानंद सूर्यवंशी २४) (सर्व भरोणीवाडा, नावेली), चंद्रकांत वासुदेव नाईक (३८, विठ्ठलापूर, साखळी), गीतांजली एकनाथ गावकर (४८), एकनाथ नागेश गावकर (७४) (दोघे देसाईनगर, साखळी), ज्ञानेश्‍वर केशव आरोस्कर (३७, गावकरवाडा- म्हापसा), विजय गोपी गावकर (३०, रुक्मिणी आरोस्कर (४५), शोभा सूर्यकांत सावंत (४०), सीता रामचंद्र माजीक (३५), विजय माजीक (१८) प्रदीप उसपकर (२०), नारायण माजीक (१६), प्रवीण राणे (२३) (सर्व पर्ये), दयानंद आरोस्कर (३७, म्हापसा), सिद्धनाथ शिंदे (२०, उसगाव तिस्क), आनंद सिद्धनाथ सूर्यवंशी (२१, नावेली) यांचा समावेश आहे.
जखमींपैकी एकनाथ नागेश गावकर, रुक्मिणी आरोस्कर, शोभा सूर्यकांत सावंत, दयानंद आरोस्कर, सिद्धनाथ शिंदे व आनंद सूर्यवंशी यांना अधिक मार लागल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले तर अन्य जखमींवर साखळी आरोग्यकेंद्रात उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच साखळी पोलिस चौकीचे साहाय्यक उपनिरीक्षक राजाराम गावकर, हवालदार हरिश्‍चंद्र परब आणि शिपाई दिनेश भोसले व शैलेंद्र मळीक यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारार्थ हालविले. श्री. गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. परब यांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

No comments: