पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)-
देशात आणि राज्यात खर्या अर्थाने लोकशाही नांदवायची असेल तर भ्रष्टाचार नष्ट व्हायला हवा, त्यासाठी केंद्रात लोकपाल आणि प्रत्येक राज्यात लोकायुक्त सशक्त करणे काळाची गरज आहे, अशी मागणी करीत ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेतर्फे आज देशातील सर्व राज्यांत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पाठिंबा म्हणून गोव्याच्या राजधानीत आयोजित केलेल्या पदयात्रेत राज्यातील सर्वच भागांतील लोकांनी सहभागी होऊन या मोहिमेला पाठिंबा दर्शविला.
यावेळी आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत विविध स्तरावरील लोकांनी आपले विचार मांडले. या लढ्यात देशातील अनेक नामांकित व्यक्तींनी आपला सहयोग दिला असून त्यात श्री श्री रवीशंकर, स्वामी रामदेवबाबा, अण्णा हजारे, स्वामी अग्नीवेश, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, देवेंद्र शर्मा अशानिष्कलंक लोकांनी ‘भारत स्वाभिमान’ च्या नावाने तयार केलेले हे व्यासपीठ असून त्याचे पहिले पाऊल म्हणजे भारतातील भ्रष्टाचार नष्ट करणे आणि त्याचीच ही सुरुवात आहे असे कमलेश बांदेकर यांनी सांगितले.
आज माणूस आपले अस्तित्व हरवत चाललेला असून त्यांनी प्रतिष्ठितपणाची संकल्पनाच बदलून टाकली आहे. केवळ क्षणिक सुखासाठी लागणार्या गोष्टी मिळवणे म्हणजे प्रतिष्ठा असा समज झाला आहे. भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन आवाज उठवणे म्हणजे आपल्या मातृभूमीचे कर्ज फेडण्यासारखे होय, असे डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी सांगितले. गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेश करमली यांनी कुणाचेही नाव न घेता राजकारण्यंावर टीकास्त्र सोडले. तेे म्हणाले की, मातीला आपल्या मातेसमान माना म्हणून सांगणारे मंत्री पोेकलीन बाळगून डोंगर पोखरून गोव्याच्या निसर्गाची लक्तरे तोडीत आहेत. आज गोवा भ्रष्टाचाराच्या रोगात घुसमटायला लागला आहे. गांधीजींचे नाव घेण्याच्या लायकीचे नसलेले मंत्री गांधीटोपी घालून पुण्यतिथी आणि जयंती साजरी करताना दिसतात. गोव्याचे राजकारणी हे मढ्यावरच्या डोक्यावरील लोणी खायला मागे पाहणार नाहीत, एवढ्या नीच वृत्तीचे बनले आहेत. निदान आज तरी भ्रष्टाचारासाठी फाशीची शिक्षा होण्याची आवश्यकता आहे. असे ते म्हणाले.
यावेळी अरविंद भाटीकर,डॉ.ऑस्कर रिबेलो, सबीना मार्टिन्स्, इक्बाल मोहिद्दीन, निर्मला सावंत, कावरे आदिवासी समाजाचा एक प्रतिनिधी निलेश गावकर यांनीही आपले विचार मांडले.
आझाद मैदानावरील स्मारकाला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी यांच्या हस्ते पुष्प अपर्ण करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. ती काकुलो सर्कलला वळसा घालून पुन्हा १८ जून रस्ता मार्गे भारत माता की जय, वन्दे मातरम् अशा विविध घोषणा देत पुन्हा आझाद मैदानावर जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेने संपन्न झाली.
सूत्रसंचालन डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी केले तर निरज प्रभू यांनी आभार मानले. या पदयात्रेला राज्यातील अनेक बिगरसरकारी संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला होता.
Monday, 31 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment