म्हापसा इस्पितळप्रकरणी नार्वेकरांचा सनसनाटी गौप्यस्फोट
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
म्हापसा जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’च्या नावे ‘फॉर्टीस’ कंपनीला देण्याचा घाट आरोग्यमंत्र्यांनी घातला आहे. याप्रकरणी आपण विरोध करतो म्हणून कंपनीतर्फे आपल्याला लाच देण्याचाही प्रयत्न झाला, असा सनसनाटी गौप्यस्फोट हळदोण्याचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांनी केला.
आपल्याच सरकाराची लक्तरे वेशीवर टांगण्याचा विडा उचललेल्या ऍड. दयानंद नार्वेकरांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावाला अनुमोदन देण्याच्या निमित्ताने आज सरकारवर चौफेर टीका केली. जिल्हा इस्पितळाच्या ठरावीक विभागांचेच खाजगीकरण केले जाईल, असा खोटा आव आरोग्यमंत्री आणतात. प्रत्यक्षात आझिलो इस्पितळात योग्य पद्धतीने चालणारे विभागही खाजगी कंपनीकडे देण्याचे निविदा प्रस्तावात म्हटले गेले आहे. राज्य सरकारने ‘पीपीपी’बाबत आपले धोरणच स्पष्ट करण्याची गरज यावेळी ऍड. नार्वेकर यांनी बोलून दाखवली. म्हापसा जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण अजिबात करू देणार नाही, असा पवित्राही त्यांनी स्पष्ट केला.
आपला मोर्चा खाण व्यवसायाकडे वळवताना त्यांनी खाण उद्योजकच सरकार चालवतात असल्याचा संशय व्यक्त केला. राज्यातून प्रतिवर्ष दोन हजार कोटी रुपयांचे बेकायदा खनिज निर्यात होते, यावरून या भ्रष्टाचाराची व्याप्ती लक्षात येते. डॉ. नंदकुमार कामत व डॉ. प्रभू यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे गोव्यातील भूगर्भात सुवर्णसाठे आहेत. एवढी वर्षे इथे खनिज उत्खनन करणार्या खाण उद्योजकांकडून या सुवर्णसाठ्यांची लूट झाली नाही कशावरून, असा सवाल करीत यात आंतरराष्ट्रीय ‘रॅकेट’ असण्याची दाट शक्यताही ऍड. नार्वेकर यांनी वर्तविली.
ड्रग्ज व्यवहारामुळे राज्याची प्रतिमा डागाळली आहे व या बेकायदा व्यवहाराविरोधात युद्ध पुकारण्याचीच गरज असल्याचे नार्वेकर म्हणाले. ‘सेझ’ तसेच ‘आयटी हॅबीटेट’ प्रकल्प रद्द केले असतील तर संबंधित कंपन्यांचे पैसे परत का केले जात नाहीत, अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. पुढील एक वर्ष एकाही खाणीला परवानगी देऊ नये व फक्त विविध योजनांचा सर्वसामान्य लोकांना लाभ मिळवून देण्याकडेच सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.पोलिसांचा धाक वापरून राजकीय वचपा काढण्याचा प्रयत्न करणारे सरकारच गुन्हेगारांना अभय देत आहे, असे सांगतानाच ‘आयज म्हाका, फाल्या तुका’ या बोधवाक्याची त्यांनी सरकारातील आपल्या सहकार्यांना आठवण करून दिली.
महाराष्ट्रातील खनिज वाहतूक बंद करू
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पेडणे मार्गे थिवी ते शिरसईपर्यंत खनिज वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे वाहन चालकांच्या जीविताला धोका निर्माण होत असून ही वाहतूक ताबडतोब बंद करा, अशी जोरदार मागणी ऍड. नार्वेकर यांनी केली. या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण होतेच आहे, तसेच इथल्या पायाभूत सुविधांवरही ताण पडत असून येत्या १५ दिवसांच्या आत ही वाहतूक बंद झाली नाही तर आपण स्वतः जनतेच्या पाठिंब्याने ती बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.
Wednesday, 2 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment