पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
ज्या राज्याचे प्रशासन कोलमडले आहे त्या राज्याची अधोगती होण्यास अधिक विलंब लागणार नाही. गोव्यातील प्रशासकीय कामकाजात सध्या जी बजबजपुरी माजली आहे तिला वेळीच लगाम घातला नाही तर राज्याचा आर्थिक व सामाजिक डोलारा कधीही कोलमडून पडेल, असा धोक्याचा इशारा आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील दुरुस्त्यांचे समर्थन करताना पर्रीकर यांनी सर्वच क्षेत्रांत माजलेल्या अनागोंदी कारभाराचा आणि सरकारच्या बेफिकीर वृत्तीचा खरपूस समाचार घेतला. ‘‘तुमच्या युवकांच्या ओठांवरील गीत सांगा, मी तुम्हांला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो’’, या स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध उक्तीचा संदर्भ देत त्याच धर्तीवर ‘तुमच्या राज्यातील प्रशासनाची झलक पाहा, तुमच्या राज्याचे भवितव्य तुम्हांला दिसेल’, असे पर्रीकर म्हणाले. गोव्यातील प्रशासकीय कारभाराचा कसा पुरता बोजवारा उडाला आहे याची काही मासलेवाईक उदाहरणे त्यांनी सभागृहासमोर सप्रमाण सादर केली. राज्यपालांच्या अभिभाषणातील तपशील आणि सत्ताधार्यांनी दिलेल्या उत्तरांतील विसंगती दाखवून देत असतानाच, संबंधित मंत्र्यांचा खात्यावर कोणताही ताबा राहिलेला नसल्यामुळेच प्रशासकीय अधिकार्यांनीही ताळतंत्र सोडल्याची टीका केली.
प्रशासकीय हलगर्जीपणाचा थेट परिणाम राज्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीवर होत असतो. सध्या गोव्याची वेगाने सुरू असलेली घसरण पाहता या सुंदर राज्याची वाट लागायला जास्त काळ लागणार नाही असे ते म्हणाले. कधीकाळी पर्यटनाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेला गोवा आज बिहारच्याही मागे फेकला गेला आहे. सरकारची चुकीची धोरणे आणि विकासाप्रति असलेली अनास्थाच याला कारणीभूत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. ज्या राज्यात चांगले रस्ते नाहीत, चांगली वाहतूक सुविधा नाही, ज्या राज्यात पर्यटक सुरक्षित नाहीत, जिथे दररोज खून, अपहरण, बलात्कार व अमली पदार्थ यांसारख्या घटना घडतात त्या राज्यात पर्यटन व्यवसाय फुलूच शकत नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
गोव्यात विजेची कमतरता असल्यामुळे आणि भूसंपादनाचे धोरण अन्यायकारक असल्याने इथे एकही नवा उद्योग यायला तयार नाही. प्रत्येक प्रकल्पाला लोकांचा विरोध होतो आहे. काही नेते आरोग्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयांवरही स्वतःची मनमानी करण्यात गुंतले आहेत. ‘पीपीपी’ तत्त्वांचे अवास्तव स्तोम माजवून स्वार्थासाठी प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातो आहे. सरकारी धोरणानुसार आरोग्यासारख्या क्षेत्रात ‘पीपीपी’चा अंतर्भाव नाही हे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना समजावून सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्यखात्याकडे ३८ रुग्णवाहिका आहेत तर मग १४९ चालकांची गरज खात्याला का भासते असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.
--------
नक्षलवादाची बिजे पेरू नका
राज्याला सध्या खनिज व्यवसायाने पुरते ग्रासून टाकले आहे. ज्या सांगे व सत्तरी तालुक्यांत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांवर गोव्याची तहान भागते त्याच तालुक्यांत या खाण उद्योगाने उच्छाद मांडला आहे. येथील वनसंपत्ती, नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत व पर्यायाने जनजीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. खनिज व्यवसायाला सरकारने दिलेला मुक्तहस्तच याला जबाबदार आहे. ज्या सांगे तालुक्यात तीस टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत अनुसूचित जमातीचे लोक राहतात त्याच तालुक्यांत या भूमिपुत्रांना बेघर करण्याचे षडयंत्र सध्या रचले जाते आहे. त्यांच्या जमिनी घशात घालून त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा सपाटाच सुरू झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर उद्या हे लोक अन्यायाविरोधात आपल्या हातात शस्त्रे घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा पर्रीकरांनी दिला. या भागाचा आपण अनेकदा दौरा केला असून तेथील भूमिपुत्रांच्या मनात खदखदत असलेला असंतोष पाहता उद्या हे लोक हिंसक होऊन सत्ताधार्यांवर चालून आले तर नवल वाटायला नको, असे पर्रीकर म्हणाले. या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याशी सरकारने त्वरित थांबवावा, त्यासाठी निश्चित असे खाण धोरण महिन्याभरात तयार करावे, एका वर्षांत खनिज वाहतुकीसाठी खास रस्ते बनवले जावेत, या व्यवसायावर कडक निर्बंध लादले जावेत आणि त्याची काटेकोर अंमलबजावणीही केली जावी. हे झाले नाही तर राज्यात कधीही सशस्त्र उठाव होऊ शकतो, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
--------
कुठल्याही चौकशीला सामोरा जाईन
गृहमंत्री पत्रकार परिषद घेऊन तोंडाला येईल ते बरळत सुटले आहेत. आरोप करण्यापूर्वी आरोपांची शहानिशा करायचेही त्यांना भान राहिलेले नाही. माझ्याविरुद्ध पुरावे असतील तर ते मला अटक का करत नाहीत? मी कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. सीबीआय, न्यायमूर्ती किंवा पोलिसांमार्फतही माझी चौकशी केली तरी चालेल; त्यासाठी मी त्यांच्यासमोर तात्काळ हजर होईन, असे पर्रीकर यांनी गृहमंत्री रवी नाईक यांना सुनावले.
राज्यातील पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. अटालाला पळून जाण्यास पोलिसांनीच मदत केली. प्रकाश मेत्री नावाचा पंच उभा करून त्यांनी अटालाला जामीन मिळवून दिला. हा प्रकाश मेत्री तब्बल ५५ प्रकरणात पंच म्हणून उभा राहिलेला आहे. अटाला बोलू लागल्यास अनेकांची बिंगे फुटतील म्हणूनच त्याला पोलिसांनी पद्धतशीरपणे बाहेर काढले असा आरोप पर्रीकर यांनी केला.
माझ्या घरी मी लोकांना कधीच भेटत नाही, मी कोणाकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारत नाही, माझा ज्यादातर वेळ घराच्या बाहेरच जातो. त्यावेळी मला अनेक माणसे भेटत असतात. अशा माणसांचा माझ्याशी संबंध लावायचा तर गृहमंत्र्यांनी तेही करावे. माझा केवळ प्रत्यक्षच नव्हे तर अशा व्यवहारात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे जरी गृहमंत्र्यांनी सिद्ध केले तरी मी त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, असे आव्हानच पर्रीकरांनी रवी नाईक यांना दिले. ज्या राज्यात साक्षात गृहमंत्र्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली जाते आणि ही धमकी देणार्यांना पोलिस पकडू शकत नाहीत तर मग राज्यातील सामान्य नागरिकांचे भवितव्य काय, असा सवाल पर्रीकर यांनी उपस्थित केला.
माझा लहान मुलगा रात्री आपल्या मित्रांसोबत हणजूण भागांत फिरायला जात असे. तो परत येईपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा लागत नसे. कदाचित त्याला पोलिस पकडतील व त्याच्या खिशात ड्रग्ज प्लांट करतील, अशी भीती मला सारखी वाटायची. पर्रीकरांना अडकवण्यासाठी संबंधित कोणत्याही थराला जातील हे मला ठाऊक होते. म्हणूनच जेव्हा माझ्या मुलाला अमेरिकेत एमबीएसाठी प्रवेश मिळाला तेव्हा मी सुटकेचा निःश्वास सोडला. माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला असला तरी त्या भीतीपासून माझी सुटका झाली.
Friday, 4 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment