Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 2 February 2011

मागण्या मान्य कराच!


अंगणवाडी कर्मचार्‍यांचा पणजीत मोर्चा


पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
सरकारी सेवेत कायम करून वेतनश्रेणी मिळेपर्यंत मुख्यसेविकेच्या वेतनाएवढे मानधन द्या; तसेच निवृत्ती होणार्‍या सेविका व मदतनिसांना रोख निवृत्ती रकमेबरोबरच मासिक निवृत्ती वेतनही सुरू करा, अशा मागण्या करत आज अखिल गोवा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत राजधानीत विराट मोर्चा काढला. सदर मोर्चा श्रमशक्ती भवनाकडून विधानसभेपर्यंत जाणार होता. परंतु, पोलिसांनी त्यांना जुन्या पुलावर अडवले.
त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा मुक्ता नाईक म्हणाल्या की, गेल्या मार्च महिन्यात अशाच प्रकारे मोर्चा काढून सरकारकडे याच मागण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, सरकारने त्या संदर्भात अद्याप कोणतीच हालचाल न केल्यामुळे पुन्हा रस्त्यावर उतरण्याची पाळी या कर्मचार्‍यांवर आली आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना तुटपुंज्या मानधनावर राबवण्याचे हे सरकारचे धोरण निषेधार्ह असल्याचे त्या म्हणाल्या. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
बालवाडीच्या कामाबरोबरच अंगणवाडी कर्मचार्‍यांना हत्तीरोगाच्या गोळ्या वाटणे, जनगणनेच्या कामात सहभागी होणे, पल्स पोलिओचे काम अशी अतिरिक्त कामेही करावी लागतात. मात्र त्याचा मोबदला मात्र अतिशय कमी दिला जातो. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा रेटावा, असा सवाल मुक्ता नाईक यांनी यावेळी केला. गेल्या पाच महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधन दिले जात नाही ही सरकारसाठी शरमेची गोष्ट असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनीही या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर करून सरकारवर खरपूस टीकास्त्र सोडले. अंगणवाडी कर्मचारी या केवळ समाजसेविका नसून त्याही मोबदल्यासाठीच काम करतात; त्यामुळे त्यांच्या हक्काचे मानधन त्यांना वेळेवर दिलेच पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा नेत्रा होबळे यांनीही आपले विचार मांडले. शेवटी उद्यापासून बंदर कप्तान येथे धरणे धरण्याचे निश्‍चित करून मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात सुमारे २००० महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

No comments: