७० मतदान केंद्रे व ३२०९० मतदार
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेची निवडणूक घेण्याची सारी तयारी सरकारी पातळीवर झालेली असून ३० प्रभागांसाठी ७० मतदानकेंद्रे स्थापण्यात येणार आहेत. मागील वेळी ही संख्या ३० होती, अशी माहिती गोवा निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदास्सीर यांनी दिली.
पणजी महापालिकेच्या निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुदास्सीर बोलत होते. यावेळी निवडणूक प्रमुख तथा उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन, उपजिल्हाधिकारी साबाजी शेटये व निवडणूक आयोगाचे सचिव एस. वाय. परब उपस्थित होते.
या वेळी मिहीर वर्धन यांनी पणजी महापालिकेच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. प्रत्येक मतदानकेंद्रात बसवण्यात येणार्या संगणकावर प्रत्येक मतदाराचे छायाचित्र घेण्यात येईल; तसेच बोटांचे ठसेही घेण्यात येतील. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता कमी आहे, असे ते म्हणाले. वाळपई पोटनिवडणुकीसाठी वापरलेले तंत्र येथेही वापरण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
१३ मार्च रोजी सदर निवडणूक होण्याची शक्यता असून दोन दिवसांत तारीख निश्चित करण्यात येईल. प्रत्येक मतदानकेंद्रात चार निवडणूक अधिकारी असतील. कोणत्याही गोंधळाविना निवडणूक पार पडली तर त्याच दिवशी फार्मसी कॉलेजमध्ये मतमोजणी करून अर्ध्या तासात निकाल जाहीर होतील असेही श्री. वर्धन म्हणाले.
Friday, 4 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment