महामार्ग बदल कृती समितीच्या सभेत पर्रीकर कडाडले
म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी): राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली गोमंतकीयांची घोर फसवणूक चालवली असून कॉंग्रेस सरकारने गोवाच विकायला काढल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केला. येथील टॅक्सीस्टँडवर राष्ट्रीय महामार्ग बदल कृती समितीने आयोजिलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपाठीवर स्थानिक आमदार फ्रान्सिस डिसोझा, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई, नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, नगरसेवक संदीप फळारी, गुरुदास वायंगणकर, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, बस मालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर, क्लाऊड अल्वारिस, अशोक प्रभू, सर्वो फर्नांडिस, सतीश लोटलीकर, टुलियो डिसोझा, संदीप कांबळी, मेहमूद खान आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्रीकर म्हणाले, या प्रस्तावित महामार्गामुळे अनेकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार आहेत. त्याची चिंता या सरकारला नाहीच. महामार्गाच्या नावाने पैसा खाणे आणि पंधरा टक्के कमिशन लाटणे हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. महामार्गामुळे गोव्याचे विभाजन दोन भागांत होणार आहे. हे महासंकट कोणा थोपवणार?
महामार्गासाठी टोल कोण भरणार, तुफानी वेगाने जाणार्या वाहनांमुळे होणार्या संभाव्य अपघातांना जबाबदार कोण आणि निसर्गावर जो घाला घातला जाणार आहे त्याबद्दल या सरकारने काही खबरदारी घेतली आहे काय, असे बिनतोड सवाल यानिमित्ताने पर्रीकरांनी कामत सरकारला विचारले. या प्रश्नांची उत्तरे देऊनच सरकारने महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करावी, असे ते म्हणाले.
खुद्द आरोग्यमंत्र्यांनाच ‘पीपीपी’ म्हणजे काय हे माहीत नाही, असा टोलाही त्यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळाचा संदर्भ देऊन लगावला.
स्थानिक आमदार डिसोझा यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनीची फार मोठी हानी होणार आहे. जेव्हा जनविरोधाची धार तीव्र होते तेव्हा सरकारने वेगळा मार्ग चोखाळायचा असतो. मात्र सध्याचे कॉंग्रेस सरकार स्वहित पाहण्यातच दंग आहे. सीलिंकचा भरपूर बोलबाला झाला. त्याचे आठ कोटी रुपये गेले कोठे याचे उत्तर या सरकारने द्यावे. शेतजमीन आणि खाजनाची हानी आरंभलेल्या या सरकारने सारे ताळतंत्रच सोडले आहे. मुख्यमंत्री प्रत्येक विषयाचा अजूनही केवळ अभ्यास करत आहेत! या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच. राष्ट्रीय महामार्ग बदल समितीला आपला जोरदार पाठिंबा आहे.
सुनील देसाई यांनीही या सरकारचा खरपूस समाचार घेतला. तसेच व्यासपीठावरील उपस्थितांची सरकारचा कडाडून निषेध करणारी भाषणे झाली. भाजप मंडलाचे अध्यक्ष राजसिंग राणे यांनी सूत्रसंचालन केले. या सभेला अभूतपूर्व जनसमुदाय उपस्थित होता.
Saturday, 29 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment