पणजी, दि. ३१ (विशेष प्रतिनिधी): ‘राज्यपाल डॉ. एस.एस. सिद्धू यांनी आज विधानसभेला उद्देशून केलेले अभिभाषण अत्यंत रटाळ व दिशाहीन होते’ अशी परखड टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीला पुढील दिशा दाखविण्याचे काम हे अभिभाषण मुळीच करु शकले नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘एक व्यक्ती म्हणून राज्यपाल यांच्याविषयी आदर असला व राज्यपालांच्या पदाला जरी मी मान देत असलो, तरी त्यांचे एक तासाचे अभिभाषण म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय होता’, असेही ते म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर म्हणाले, ‘खरेच सांगतो, राज्यपालांचे अभिभाषण ऐकताना मला अनेकदा झोप आली, डोळे पेंगू लागले, एवढे त्यांचे भाषण कंटाळवाणे होते. सरकारला दिशा दाखविण्याचे काम राज्यपालांचे भाषण करते, पण इथे तर त्यांच्या भाषणाची‘दशा’च झाली. ज्या कुणी हे भाषण लिहिले तो अगदी बिनडोकच असावा किंवा त्याची आकलनशक्ती कीव करण्याइतपत असावी, असा टोलाही पर्रीकरांनी लगावला.
‘राज्यपालांच्या भाषणात अनेक संदर्भ चुकीचे होते आणि आकडेवारीसुद्धा. उदाहरणार्थ, सोयीस्कर आकडेवारीच नमूद करुन, गोव्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे, गुन्हे कमी झाले आहेत, असा आभास निर्माण करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे कार्य आणि त्यांनी नोंदविलेले मुठभर गुन्हे हे सगळे हास्यास्पद आहे. गोव्यात येणार्या विदेशी पर्यटकांची दिलेली आकडेवारीही सदोष आहे. राज्यपालांनी म्हटल्याप्रमाणे गोवा हे देशी आणि विदेशी पर्यटकांच्या पसंतीला उतरणारे देशातील दहा प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे, हे खचितच खरे नव्हे’ असे पर्रीकरांनी ठासून सांगितले.
हल्लीच राज्यपालांना भेटून विरोधी पक्षाने गोव्यातील एकंदर स्थिती आणि महत्वाचे मुद्दे यावर सखोल चर्चा केली होती. पण या कोणत्याच मुद्यापर्यंत राज्यपालांचे अभिभाषण पोहोचू शकले नसल्याची खंतही पर्रीकरांनी यावेळी व्यक्त केली.
अभिभाषणावरील अनेक मुद्दे खोडून काढताना पर्रीकरांनी सांगितले, ‘पाण्याची टंचाई, महागाई, अनेक सरकारी प्रकल्पामुळे बेघर होणारी जनता, वाढती रहदारी आणि वाहन अपघात, खाणीमुळे होत असलेला र्हास, वाढती गुन्हेगारी, ड्रग - पोलिस हितसंबंध अशा अनेक ज्वलंत प्रश्नांसंबंधी सरकारला दिशा दाखविण्याचे काम या अभिभाषणातून झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. अभिभाषणात म्हटल्याप्रमाणे, राज्याच्या ‘जीडीपी’त झालेली वाढ ही प्रामुख्याने खाणव्यवसायाच्या प्रगतीतून झालेली असून ती निश्चितपणे भूषणावह नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे कुणी एका सरकारी अधिकार्याने केवळ आकडेवारी बदलून, थोडासा फरक करुन राज्यपालांचे जुने भाषणच नव्याने केल्यासारखे असल्याचे पर्रीकर म्हणाले.
Tuesday, 1 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment