Saturday, 12 March 2011
शक्तिशाली भूकंपाने जपान उद्ध्वस्त
• भूकंपापाठोपाठ त्सुनामीच्या ३३ फूटी लाटा • हजारो ठार
• ४५ लाख इमारती जमीनदोस्त • भूकंपाची तीव्रता ८.९
• २० देशांना त्सुनामीचा धोका • भारताला धोका नाही
टोकियो, दि. ११
संपूर्ण उत्तर जपानला आज सकाळी महाशक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला. रिश्टर स्केलवर ८.९ इतकी तीव्रता असलेल्या भूकंपापाठोपाठच महाविनाशी त्सुनामीच्या सुमारे ३३ फूट उंच लाटांनी सर्वत्र हाहाकार माजविला. समुद्राचे पाणी ईशान्येकडील अनेक शहरांमध्ये अनेक किलोमीटर आतपर्यंत घुसले असून, सुमारे ४० लाख इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत. या भूकंपाने अनेक इमारती आणि कारखान्यांना आगी लागल्या असून, इचिहारा तेल शुद्धीकरण केंद्रही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सुमारे ८० ठिकाणी भीषण आगी लागल्याचे वृत्त आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहरापासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मियामी शहराजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात नेमकी किती प्राणहानी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत सूत्रांनी मात्र, आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता झाले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सुमारे २० देशांना त्सुनामीपासून मोठा धोका होऊ शकतो मात्र भारताला त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जपानचा किनारपट्टीचा भाग या भूकंपाने आणि त्सुनामीच्या लाटांनी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. असंख्य वाहने, लहान नौका, छोटी विमाने आणि मोठी जहाजेही त्सुनामीच्या लाटांवर तरंगत बर्याच दूर वाहून गेल्या. मियागी प्रांतातील केसेन्नुमा शहर आणि फुकुशिमा शहर पूर्णपणे पाण्याच्या विळख्यात सापडले आहे. १९९५ नंतर जपानने इतका महाशक्तिशाली भूकंप प्रथमच अनुभवला आहे.
या भूकंपामुळे आणि त्सुनामीमुळे नेमके किती नुकसान झाले, किती लोकांचा बळी गेला आणि किती जखमी झाले, याचा आढावा घेण्यासाठी तसेच मदत व बचाव कार्य हाती घेण्यासाठी जपान सरकारने ९०० चमू तयार केल्या आहेत.
८.९ इतक्या तीव्रतेचा पहिला धक्का आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार ११.१६ वाजता) बसला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment