Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 8 March 2011

ड्रग्ज चौकशी प्रकरणी मुख्य सचिवांचे ‘सीबीआय’ला पत्र

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
पोलिस, ड्रग्स माफिया व राजकारणी साटेलोटे प्रकरणी थेट केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशीसाठी स्वतंत्र पत्र पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी दिली. यापूर्वी या प्रकरणी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले होते. या प्रकरणी सरकार आढेवेढे घेत असल्याचा आरोप होत असल्यानेच हे नव्याने पत्र थेट ‘सीबीआय’ ला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
गोव्यात गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी थंडावल्याचा आरोप होत असतानाच आता सरकारकडून या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे देण्याचे घाटत आहे. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती परंतु ‘एनएसयुआय’ या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली विशेष पोलिसांनी विशेषाधिकार देण्याची अधिसूचना राज्य गृह खात्याकडून जारी करण्यात आली आहे. यासंबंधी अद्याप ‘सीबीआय’कडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा संशयित ‘अटाला’ याला विदेशात ‘इंटरपोल’कडून अटक करण्यात आली असली तरी त्याला गोव्यात आणण्यासाठीची प्रक्रिया अद्याप पुढे सरकत नसल्याचेच दिसून आले आहे. हे प्रकरण पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात उफाळून येण्याचा धाक असल्यानेच आता राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे सोपवण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे दाखवण्यासाठीच हा पत्रव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे.

No comments: