पणजी, १० (प्रतिनिधी)
पोलिस ड्रग माफिया प्रकरणात केंद्र सरकारलाही प्रतिवादी करून घेण्यात आले असून आज केंद्र सरकारच्या वकिलाने या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या १७ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना ‘एनएसयुआय’ने हे प्रकरणात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यासाठी ही याचिका सादर केली आहे. आतापर्यंत यात राज्य सरकार, केंद्रीय गुन्हा अन्वेषण व राज्य पोलिस खात्याला प्रतिवादी करून घेण्यात आले आहे. गेल्यावेळी केंद्र सरकारलाही या प्रतिवादी करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते.
पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि बड्या राजकीय व्यक्ती गुंतल्याने या प्रकरणाची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फतच चौकशी केली जावी, अशी याचना न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणाची याचिका न्यायालयात सादर होताच राज्य सरकारने एका आदेशाद्वारे हे प्रकरण केंद्र सरकारकडे पाठवून दिले होते. परंतु, अद्याप या प्रकरणाचा ताबा सीबीआयने घेतलेला नाही. केंद्र सरकारचे कोणतेही कर्मचारी या प्रकरणात गुंतलेले नाही, असा दावा करून सीबीआयाने गेल्यावेळी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. तसेच, अद्याप या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही आदेश मिळालेला नाही, असेही सीबीआयने गोवा खंडपीठाला कळवले होते.
याप्रकरणात इस्रायली ड्रग माफिया ‘अटाला’ आणि ‘दुदू’ गुंतलेले असून यात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांच्यावरही आरोप झालेले आहेत. मात्र त्यांनी तो आरोप फेटाळून लावलेला आहे.
Friday, 11 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment