Monday, 7 March 2011
‘पणजी फर्स्ट’च्या प्रचाराला जोर
• ‘टुगेदर टू..’ला मर्यादा तर ‘आघाडी’ची गोची
• निवडणूक आयुक्तांतर्फे भरारी पथकांची नियुक्ती
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेच्या दि. १३ मार्च रोजी होत असलेल्या निवडणुकीला आता थोडेच दिवस बाकी असून निवडणुकीत उतरलेले उमेदवार जीव तोडून घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. पणजीकरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘पणजी फर्स्ट पॅनल’च्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून या पॅनलला लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले तर ‘टुगेदर टू पणजी’ या पॅनलच्या प्रचाराला बर्याच मर्यादा पडल्याचे महापालिकेच्या प्रभागात फेरफटका मारला असता दिसून आले.
त्याचप्रमाणे एका गटाकडून निवडून येण्यासाठी किमती वस्तू वाटल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने निवडणूक आयोगाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘भरारी पथकां’ची नियुक्ती केल्यामुळे व या भरारी पथकांनी ताळगाव भागातील प्रभागावरच जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे किमती वस्तू वाटणार्या सदर गटाची चांगलीच गोची झाली आहे.
‘पणजी विकास आघाडी’ची गोची
मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या ‘पणजी विकास आघाडी’ने सर्वांत प्रथम पॅनल जाहीर केले. पहिल्याच दिवशी म्हणजेच सर्वांत प्रथम उमेदवारी अर्ज भरले व प्रचारही सर्वांत आधी सुरू केला होता. मात्र या आघाडीचा जाहीरनामा अजून प्रसिद्ध झालेला नाही. मागील जाहीरनाम्यातील एकही काम न केल्यामुळे कदाचित जाहीरनाम्याला उशीर केलेला असू शकतो. मात्र या आघाडीच्या उमेदवारांनी अनेक दिवसापासून घरोघरी प्रचार करण्यास सुरू केला आहे. त्यातच या आघाडीच्या उमेदवाराकडून किमती भेटवस्तू वाटण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्यामुळे निवडणूक आयुक्त एम. मुदस्सीर यांनी या वस्तू वाटणार्यावर नजर ठेवण्यासाठी निरीक्षक (भरारी पथक) नेमले. या भरारी पथकाने ताळगाव परिसरातीलच प्रभागावर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे आघाडीच्या ‘धनवान’ व ‘दानशूर’ उमेदवारांची गोची झाल्याचे वृत्त आहे. गेल्या पाच वर्षात विकास न केल्याने लोकांच्यासमोर कसे जावे याच विवंचनेत आघाडीचे उमेदवार सापडले आहेत.
’पणजी फर्स्ट’चा प्रचार तेजीत
एकीकडे आघाडीची गोची झालेली असतानाच त्याला तोडीस तोड टक्कर देण्यासाठी पणजीच्या सर्व मान्यवर लोकांनी एकत्र येऊन स्थापलेली व भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या पणजी फर्स्टचा प्रचार मात्र तेजीत सुरू असून मनोहर पर्रीकर व माजी महापौर अशोक नाईक यांचे निःस्वार्थी व विकसित नेतृत्व व नुकताच पणजी फर्स्टने जाहीर केलेला पणजी विकासाचा वचननामा यामुळे लोकांचा कल पणजी फर्स्ट पॅनलच्या युवा उमेदवारांकडे वळला आहे. पणजी फर्स्टच्या उमेदवारांच्या घरोघरी प्रचारात अनेक लोक सहभागी होताना दिसत आहेत. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना व अशोक नाईक महापौर असताना पणजीचा झालेला विकास लोकांसमोर असल्याने लोक पणजी फर्स्टच्या हाती महापालिका देण्यास सज्ज झाल्याचे अनेक मतदारांच्या बोलण्यातून जाणवत आहे.
‘टूगेदर टू पणजी’च्या प्रचाराला मर्यादा
वरील दोन पॅनलबरोबरच टुगेदर टू पणजी हे राष्ट्रवादी पक्षाने समर्थन दिलेले पॅनल या निवडणुकीत उतरले असून या पॅनलचे उमेदवारी मर्यादित असून त्यांनी आपापल्या प्रभागातच प्रचार करण्यास प्रारंभ केला असून इतर अपक्ष उमेदवारसुद्धा आपापल्या प्रभागात मतदाराला आपल्या बाजूने वळवण्यात मग्न आहेत. दरम्यान टुगेदर टू पणजी पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराला माजी मंत्री मिकी पाशेको येणार असल्याचे सांगण्यात येत असून ते आल्यानंतरच टुगेदर टू पणजी चर्चेत येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment