Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 6 March 2011

‘किंग मोमो’ची राजवट सुरू


‘खा, प्या, मजा करा’ घोषणेने कार्निव्हलला प्रारंभ
पणजी, दि. ५ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
‘खायात पियात मजा करात’ म्हणत किंग मोमोच्या घोषणेने आजपासून गोव्यात कार्निव्हलला सुरुवात झाली. येथील जुन्या सचिवालयाकडून सुरू झालेल्या या कार्निव्हल मिरवणुकीचा शुभारंभ राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या उपस्थित बावटा दाखवून झाला. त्यामध्ये निसर्ग वाचवा, विटी-दांडू, लगोरी यासारखे पारंपरिक खेळ तसेच प्राणी वाचवा, वाढत्या कचरा प्रकरणावर उजेड टाकणारे चित्ररथ, गोव्यातील पारंपरिक व्यवसाय, क्रिकेट विश्‍वचषक मिरवणूक आदी विषयांवरील चित्ररथ आकर्षक होते.
‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ संघटनेने वाढता भ्रष्टाचार, बेकायदा जमीनविक्री प्रकरण, अमली पदार्थांची विक्री, राजकारणात चाललेला धिंगाणा या विषयांवर प्रकाश टाकणारी जाहिरात करून माफिया राज्यकर्त्यांच्या विरोधात दोन हात कण्यासाठी आज आपण एकत्र होणे काळाची गरज आहे अशी पत्रके वाटली. सदर मिरवणुकीत एकूण ९५ चित्ररथ सहभागी झाले होते. ही मिरवणूक जुन्या सचिवालयाकडून कला अकादमीपर्यंत चालली होती.
गोवा ही सांस्कृतिक वारसा असलेली भूमी आहे. या संस्कृतीचा एक भाग म्हणून कार्निव्हल उत्सव साजरा केला जातो, असे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी मिरवणुकीच्या उद्घाटनावेळी सांगितले.



वाहतुकीची कोंडी
या उत्सवामुळे पणजीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. शहरातून बाहेर जाणार्‍या लोकांना बसस्थानकापर्यंत चालत जावे लागले तर स्वतःचे वाहन घेऊन जाणार्‍यांना पाच मिनिटांच्या वाटेसाठी एक तास रखडावे लागले. कार्निव्हल मिरवणुकीची सुरुवात दुपारी ३ वाजल्यापासून झाली होती, परंतु वाहतुकीत बदल फक्त दोन तास अगोदर म्हणजे दुपारी १ वाजता करण्यात आला. त्यामुळेच वाहतुकीची समस्या निर्माण झाली.

No comments: