Wednesday, 9 March 2011
मडकईकर-बाबूश गटात भाटले येथे धुमश्चक्री
परस्पर विरोधी तक्रारी दाखल
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेचे वातावरण भाटले पणजी येथे तापू लागले असून आज बाबूश आणि उदय मडकईकर गटाच्या कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी मारहाणीच्या तक्रारी पणजी पोलिस स्थानकावर सादर केलेल्या आहे. देवेंद्र नाईक यांनी प्रचार करीत असताना शिवीगाळ करून धमकी दिली तर, सुशांत नाईक यांनी आपल्यावर प्रचार करताना दगडफेक केल्याच्या परस्पर विरोधी तक्रारी दोघांनीही दिलेल्या आहे. पोलिसांनी दोघांच्या विरोधात फौजदारी कलम १५१ नुसार गुन्हा नोंद करून अटक केली. त्यानंतर दोघांनी विभागीय न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर करून जामिनावर सोडण्यात आले.
दुपारी सुमारे १२.४५ वाजता हा प्रकार घडला. पणजी पालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराला जोर आला आहे. यात भाटले भागात बाबूश मोन्सेरात आणि उदय मडकईकर गट आमने सामने आल्याने येथील परिस्थिती नाजूक बनली आहे. आज दुपारी दोन्ही गट प्रचाराला उतरले असता दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्याही घटना घडल्या. बाबूश मोन्सेरात यांनी सुरुवातीला उदय मडकईकर यांना आपला पॅनलमध्ये स्थान देऊन त्यानंतर त्यांची हकालपट्टी केल्याने येथील मडकईकर समर्थक बाबूश यांच्यावर नाराज बनले आहेत. तर, बाबूश समर्थक उदय मडकईकर यांना कोणत्याही परिस्थितीत पाडण्यासाठी जोराने कामाला लागले आहेत.
दरम्यान, दीपाली श्यामसुंदर शेटगावकर यांनी अशोक, ज्योती व रेखा या तिघांवर मारहाण व विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरुनच हा प्रकार झाल्याचे पणजी पोलिसांनी सांगितले. तक्रारीनुसार आज दुपारी अशोक, ज्योती व रेखा यांनी आपल्या घरात घुसून आपली नाईटी फाडली व मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांवरही भा. दं. सं. ५०६, ५०४, ३५४ व ४५२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक श्याम आमोणकर करीत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment