Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 9 March 2011

माहिती मिळवण्याच्या स्वातंत्र्याचा वापर करा - पर्रीकर

• ‘गोवादूत’तर्फे महिला दिन उत्साहात
• ‘टेंप्टेशन’सह सहा पुस्तकांचे प्रकाशन

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
महिलांनी माहिती मिळवण्याच्या स्वातंत्र्याचा प्रभावीपणे वापर करुन समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध सतत आवाज उठवावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केले. आज दि. ८ रोजी १०० व्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पणजीतील गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजिलेल्या महिला दिन सोहळ्यात श्री. पर्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून गोवा विद्यापीठाच्या व्याख्यात्या डॉ. किरण बुडकुले, खास निमंत्रित म्हणून बँक ऍाफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आनंद बडे, ‘गोवादूत’चे संपादक गंगाराम म्हंाबरे, अभिनव पब्लिशर्सचे संचालक सागर अग्नी, संचालिका ज्योती धोंड व लेखिका मेघना कुरुंदवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. पर्रीकर यांनी यांनी सांगितले की, सकारात्मक विचारधारा अंगी बाळगून समाजहितासाठी प्रत्येकाने कार्य करायला हवे. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण महिलांसाठी विविध योजना आखल्या व त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. खरे तर महिला दिन साजरा करावाच लागू नये. प्रत्येक दिवस हा महिला दिवसच वाटावा असे दैदीप्यमान कार्य महिलांनी करावे. या प्रसंगी लेखिका कुरुंदवाडकर यांनी ‘गोवादूत’च्या ‘अक्षरदूत’ पुरवणीत लिहिलेल्या ‘साठा उत्तराची कहाणी’ या लेखमालेवर ‘गोवादूत’तर्फे प्रकाशित पुस्तकाचे संचालिका ज्योती धोंड यांनी ‘अन्नपूर्णा’ या पाककला पुस्तकाचे इंग्रजीमध्ये अनुवादन केलेल्या ‘टेंप्टेशन’ या पुस्तकाचे श्री. पर्रीकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच कुरुंदवाडकर यांनी लिहिलेल्या ‘तिची कथा’, ‘रोलर कोस्टर’, ‘उत्तरांचल ते आंचल’ व ‘मनात माझ्या’ या चार पुस्तकांचे अनुक्रमे मंदा सावंत, सुनिता गावणेकर, शैलेश कामत व सुहास बोबडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुलगी होणे भाग्य ः डॉ. बुडकुले
या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना डॉ. किरण बुडकुले म्हणाल्या की, महिलांनी फक्त बोलून न थांबता आपले कौशल्य व कार्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवून द्यावे. मुलगी होणे ही भाग्याची गोष्ट असून फक्त मुलगाच हवा ही मनोधारणा प्रथम महिलांनीच बदलायला हवी. त्यानंतर पुरुषांना सदर गोष्ट पटवून द्यायला हवी. समाजातील वाईट गोष्टींवर प्रहार करून समाजहितासाठी जिवाचे रान करणार्‍या महिला सर्वत्र तयार व्हायला हव्यात. त्यानंतरच महिलांना उच्च स्थान मिळून त्यांच्या भावनांचा सर्वत्र आदर केला जाईल असे सांगून डॉ. बुडकुले यांनी ज्योती धोंड व ‘गोवादूत’ परिवाराचे अभिनंदन केले.
संपादक श्री. म्हाबरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘गोवादूत’ हा सर्वसामान्यांच्या हितासाठी समाजातील वाईट गोष्टीवर नेहमीच प्रहार करत आलेला असून कॅसिनोसारख्या वाईट गोष्टीला सतत विरोध करण्याचे कार्य या वृत्तपत्राने नेहमीच केले आहेे. संचालक श्री. अग्नी यांनी महिला दिन सोहळा आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. श्री. बडे, कुरुंदवाडकर व प्रा. सुमन सामंत आदींनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी ‘गोवादूत’चे पुरवणी संपादक पुष्पाग्रज (अशोक नाईक ) यांच्या ‘शांती अवेदना’ या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वागतगीत मीना समुद्र यांनी सादर केले. सूत्रसंचालन गिरिजा मुरगुडी यांनी रसाळ शैलीत केले. नीता कळंगुटकर, संगीता दळवी व दया भोबे यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. ‘गोवादूत’चे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी आभार मानले.

No comments: