• भक्तांना रस्त्यावर उतरवण्याचा संकल्प
• ‘शिरगाव बचाव अभियाना’तर्फे जनजागृती
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
केपे तालुक्यातील कावरे पिर्लवासीयांनी बेकायदा खाण व्यवसायाविरोधात दिलेला यशस्वी लढा आता शिरगाववासीयांनाही खुणावू लागला आहे. शिरगावातील खाण उद्योगाचा अमर्याद विस्तार या गावच्या मुळावरच आला असून आता कुठेतरी या खाण व्यवसायाला पूर्णविराम देण्याची गरज येथील ग्रामस्थांना वाटू लागली आहे. शिरगाव बचाव अभियानाच्या झेंड्याखाली काही ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असून शिरगावातील सर्व भक्तगणांना एकत्रित करून हा गाव वाचवण्याचा विडाच उचलला आहे. शिरगावच्या रक्षणार्थ भक्तांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन सुरेश बी. गावकर यांनी केले आहे.
याप्रकरणी शिरगाव ग्रामस्थांनी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना निवेदन सादर केले आहे. शिरगावांत मेसर्स राजाराम बांदेकर शिरगाव माईन्स प्रा. लि, मेसर्स चौगुले ऍण्ड कंपनी प्रा. लि, शिरगाव माईन्स ऍण्ड मेसर्स धेंपो मायनींग कॉर्पोरेशन प्रा. लि. (वेदांत) या कंपन्यांतर्फे खाण उद्योग सुरू आहे. या प्रकरणी टीसी-४/४९, ५/४९ व १५/४१ आदी जागेत मोठ्या प्रमाणात कोमुनिदाद जमिनीचा समावेश आहे. या खाण परवान्यात येथील अनेक लोकांची घरे आहेत. शिरगावात सध्या ग्रामस्थांना योग्य रस्ता नाही, शेती खाण मातीमुळे उद्ध्वस्त झाली आहे. धूळप्रदूषण येथील ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजले आहे व त्यात सर्वांत गंभीर प्रश्न म्हणजे या गावातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट करण्याचे कामच खाण उद्योगाकडून सुरू आहे. याठिकाणी पाण्याचे पंपिंग बंद करण्याचे आदेश दिले असतानाही त्याचे उल्लंघन खाण उद्योजकांकडून सुरू आहे. गावातील ९० टक्के विहिरी, प्राचीन आयुर्वेदिक झर, तीर्थाची तळी, आकवाराची तळी तसेच अन्य नाले आटले आहेत. येथील खंदकात साठलेले पाणी मोठ्या क्षमतेच्या पंपाकरवी खाली करण्याच्या प्रकारांमुळे मूळ नैसर्गिक साठेही नष्ट होत चालले आहे. या कृतीद्वारे या खाण उद्योजकांकडून पर्यावरणाची जबर हानी सुरू असताना आपले सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.
शिरगाव कोमुुनिदादची जागा चुकीने या खाण उद्योजकांच्या नावे लागली आहे व त्यामुळे इथे बेकायदा कोमुनिदाद जमिनीवर खाण उद्योग सुरू आहे. कोमुनिदाद जमिनीच्या संरक्षणार्थ अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाच्या आधारावर न्यायालयीन लढा पुढे नेण्याचाही निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. याठिकाणी खाण उद्योजकांनी केवळ कोमुनिदादच नव्हे तर सरकारी, खाजगी व देवस्थानच्या जमिनीवरही अतिक्रमण केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. महसूलमंत्री डिसोझा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन शिरगाववासीयांना दिल्याची माहिती श्री. गावकर यांनी दिली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्वरित हस्तक्षेप करून शिरगावची वाताहत रोखावी अन्यथा राज्यभरातील भक्तांना त्यांच्या देवीच्या या पवित्र स्थळाच्या रक्षणासाठी कायदा हातात घेणे भाग पडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Thursday, 10 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
मुख्यमंत्री दिगंबर कामत काय या समस्येवर तोडगा काढतील असे वाटते, ते स्वःता तर गोव्याच्या खाण व्यवसायाचे मेरुमणी आहेत, जे गेली कीत्येक वर्षे ते खाते सांभाळत आहेत, आणि त्यांच्या कार्य काळातच हे असले अवास्तव खाण उत्खनन सूरु झाले आहे, आणि म्हणे गोव्याचे मुख्यमंत्री शांत स्वभावाचे, सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेणारे, सगळ्यांना बरोबर घेउन जाणारे, वा रे वा
अजब गोवा की गजब कहानी
thank god at least someone came up with something...
Digambar Kamat is a CURSE to GOA.. n Goans... Hez a "Leach" who is sucking GOAN BLOOD...
Post a Comment