Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 11 March 2011

कोळसा प्रदूषण न रोखल्यास भाजप रस्त्यावर उतरणार

आर्लेकर यांचा पत्रपरिषदेत इशारा

वास्को, दि. १० (प्रतिनिधी)
येत्या आठ दिवसांत एमपीटीकडून वास्को शहरात होत असलेल्या कोळसा प्रदूषणावर नियंत्रण न आणल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कडक आंदोलन छेडतील. असा इशारा भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज (दि.१०) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाहतूक खाते, तसेच एमपीटीने शहरात होणार्‍या कोळसा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी मागणी यावेळी श्री. आर्लेकर यांनी केली.
आज संध्याकाळी वास्को भाजप मंडळातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कोळसा प्रदूषणाची समस्या असल्याची माहिती श्री. आर्लेकर यांनी दिली. याबाबत एमपीटी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक दिवस येथील नागरिक हा त्रास सोसत असून कोळसा प्रदूषणाविरुद्ध भाजपने यापूर्वी विरोध केला असल्याची माहिती श्री. आर्लेकर यांनी दिली. ज्या ज्या वेळी एमपीटीला कोळसा हाताळणी काळजीपूर्वक करून प्रदूषणावर नियंत्रण आणण्यास सांगितले होते. तेव्हा तेव्हा यावर उपाय काढण्याचे आश्‍वासन देत याकडे दुर्लक्ष केल्याचे श्री. आर्लेकर म्हणाले.
प्रदूषणामुळे येथील अनेक लोक विविध आजारांना बळी पडत आहेत. एमपीटी व्यवस्थित कोळसा हाताळणी करत नसल्याने तसेच वाहतूक केला जाणारा कोळसा हा ट्रकातून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात नेण्यात येत असल्याने ह्या कोळशाचे प्रदूषण वास्को शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाहतूक खाते, तसेच एमपीटीने याबाबत आता कडक उपाय योजावेत अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली.
हल्लीच झालेल्या एका सर्वेक्षणात वास्कोत कोळसा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे सिद्ध झाल्याची माहिती श्री. आर्लेकर यांनी यावेळी दिली. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत एमपीटीला उपाय काढण्यास सांगितले होते. एमपीटी जर ही जबाबदारी टाळत असेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला ही कोळसा हाताळणी बंद करण्याचा अधिकार असून एमपीटकडून कारवाई करून घ्यावी असे आवाहन श्री. आर्लेकर यांनी केले.
श्री. आर्लेकर पुढे म्हणाले की, वाहतुकीच्या मार्गाने नेण्यात येत असलेल्या कोळशामुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक खात्याने पावले उचलण्याची गरज आहे. रस्त्याच्या मार्गाने नेण्यात येणारा कोळसा हा ट्रकात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात असतो. त्याचा स्थानिकांना बराच त्रास होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी वाहतूक खात्याने खनिज ट्रकांवर कारवाई केली होती. अशी मोहीम याबाबतही का करण्यात येत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच एमपीटीने चार वर्षापूर्वी रस्त्यावरून होत असलेली कोळसा वाहतूक बंद करून ती रेल्वेमार्गाने करण्याचे आश्‍वासन दिले होते. एमपीटी फक्त आश्‍वासनेच देत असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या आठ दिवसांत ही प्रदूषण समस्या दूर न केल्यास भाजप याविरुद्ध आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर पत्रकार परिषदेस भाजपचे प्रशांत नार्वेकर उपस्थित होते.

No comments: