Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 10 March 2011

निवडणूक आयुक्त मुदस्सीर यांच्याविरोधात पोलिस तक्रार

रजेवर असूनही अधिसूचना काढल्याची तक्रार

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
पणजी महापालिका निवडणुकीची अधिसूचना लखनौ उत्तर प्रदेश येथून काढल्याने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांच्याविरुद्ध पणजी पोलिस स्थानकात तक्रार सादर करण्यात आली आहे. पणजी पालिका निवडणुकीची ज्या दिवशी अधिसूचना काढण्यात आली त्यावेळी निवडणूक आयुक्त लखनौमध्ये उपस्थित होते. तसेच, सरकारी नोंदीनुसार ते रजा घेऊन उत्तर प्रदेश येथे गेले होते. तरीही त्यांनी काही राजकीय लोकांचे हित जपण्यासाठी रजेवर असताना ही अधिसूचना काढली, असा आरोप करून त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करून चौकशी केली जावी, अशी विनंती करून उल्हास नाईक देसाई व महेश कामत यांनी ही तक्रार केली आहे.
पणजी पोलिसांची येत्या २४ तासात या तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिसांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही या अर्जात म्हटले आहे. कोणतीही तक्रार २४ तासात नोंद करून घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असून त्यानुसार या तक्रारीची नोंद करून त्याची एक प्रतही तक्रारदारांना देण्याची विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अद्याप याची कोणतीही नोंद करुन घेतलेली नाही.
डॉ. मुदस्सीर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास लावले. त्यानंतर त्यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कोणत्याही अधिकार्‍याला स्वेच्छा निवृत्ती घेण्यास भाग पाडून त्यांना आयुक्तपदाचे पद बहाल करणे उचित आहे का, असाही प्रश्‍न तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
पालिका निवडणुकीची अधिसूचनेवर सही केली त्या दि. १४ फेब्रुवारी रोजी डॉ. मुदस्सीर हे लखनौमध्ये उपस्थित होते. तरीही या अधिसूचनेवर पणजी येथे सही केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांनी दि. ७ ते १८ फेब्रुवारीपर्यंत रजा राज्यपालांकडून मंजूर करून घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपण अलिगड उत्तर प्रदेश येथे असणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करावी, तसेच, त्यांचा जवळचा मंत्री आणि राजकारणी असलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडून हे कृत्य करून घेतल्याचेही म्हटले आहे.
हा भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याने डॉ. मुदस्सीर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन कायदा १३(१) सी, १३ (१) डी, १३(१) ई, तसेच, २१८, ४०५, ४०९, ४६८, ४७१ व १२०(ब) कलमा अर्ंतगत गुन्हा नोंद करावा, असेही तक्रारीत म्हटले आहे.

1 comment:

Bal Kantak said...

Vaghachya Shikarila Sheli Sakshidar