* विधानसभा निवडणुकीतील चर्चा ङ्गिस्कटली
* यापुढे मुद्यावर आधारित पाठिंबा
* संपुआ सरकार संकटात
* सरकारला धोका नाही : कॉंग्रेस
चेन्नई/नवी दिल्ली, दि. ५
विधानसभेची निवडणूक होऊ घातलेल्या तामिळनाडूत गेल्या सात वर्षांपासून अतूट राहिलेल्या कॉंग्रेस आणि द्रमुक यांच्यातील युती आज जागा वाटपाच्या मुद्यावरील चर्चा ङ्गिस्कटल्याने संपुष्टात आली. या रागाने द्रमुकने केंद्रातील कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आमच्यातील युतीचे संबंध आता संपुष्टात आले असून यापुढे केंद्र सरकारला केवळ मुद्यांवर आधारित पाठिंबा देण्यात येईल, असे द्रमुकने जाहीर केले. दरम्यान, या घडामोडींमुळे संपुआ सरकारवर राजकीय संकट आले असले तरी सरकारला कुठलाही धोका नसल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे.
आज सकाळी द्रमुक आणि कॉंग्रेस यांच्यात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. आधी ६० जागांवर सहमत झालेल्या कॉंग्रेसने ऐनवेळी तीन अतिरिक्त जागा मागताना पक्षाला पसंतीचे मतदारसंघ निवडण्याची मुभा देण्यात यावी अशी भूमिका घेतली. यावर द्रमुकच्या नेत्यांनी आक्षेप घेत बैठक गुंडाळली. तदनंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्याशी संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण तोसुद्धा यशस्वी झाला नाही.
लोकसभेत १८ खासदार असलेल्या द्रमुक कार्यकारिणीची आज सायंकाळी निर्णायक बैठक झाली. कॉंग्रेसच्या भूमिकेवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. कॉंग्रेसची भूमिका अमान्य असल्याचे स्पष्ट करीत बहुतांश नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘कॉंग्रेसची ही भूमिका द्रमुकला एकाकी पाडण्यासाठी आणि संपुआ सरकारमधून बाहेर काढण्यासाठीच आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे संपुआत कायम न राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’ असे द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले. केंद्रातून आपले मंत्री माघारी घेण्यात येणार असून ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसच्या भूमिकेचे आम्हांला आश्चर्य वाटत आहे. यापुढे संपुआ सरकारला केवळ मुद्यांवर आधारित पाठिंबा देण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. तामिळनाडूतील द्रमुक-कॉंग्रेस युती कायम राहावी अशी कॉंग्रेसची इच्छा मुळीच दिसत नाही असेही या ठरावात नमूद करण्यात आले.
अलीकडेच स्पेक्ट्रम घोटाळ्यात द्रमुकचे वरिष्ठ नेते आणि माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना अटक करण्यात आली. या मुद्यावरून दोन्ही पक्षांतील संबंध दुरावले गेले होते. यातच जागा वाटपाच्या मुद्यावरून हा दुरावा आणखीच वाढला आणि त्याची परिणती संपुआ सरकारमधून द्रमुक बाहेर पडण्यात झाली.
धोका नाही : कॉंग्रेस
द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नाही असे कॉंग्रेस पक्षाने आज जाहीर केले. द्रमुकने आपले १८ खासदारांचे समर्थन मागे घेतले आहे, पण सरकारकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे पाठबळ आहे असे या पक्षाने म्हटले आहे.
आधीची घडामोड
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कॉंग्रेस आणि द्रमुक यांच्यात जागा वाटपाची चर्चा सुरू झाली होती. २३४ सदस्यीय विधानसभेत कॉंग्रेसने या आधीच ६० जागांवर सहमती दर्शविली होती. पण आज अचानक दिल्लीहून कॉंग्रेस नेतृत्वाचा ङ्गोन आला आणि द्रमुकने कॉंग्रेस पक्षाला ६३ जागा सोडाव्यात, इतकेच नव्हे तर आम्हांला हवे असलेल्या मतदारसंघांची निवड आम्हीच करू असे कळविले. द्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. कॉंग्रेसने ऐनवेळी जास्त जागांची मागणी केली आणि सोबतच आपल्या पसंतीचे मतदारसंघ निवडण्याचा अधिकारही मागितला. हे योग्य नसून युतीधर्माच्या चौकटीतही बसत नाही, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
Sunday, 6 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment