Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 11 March 2011

कुणबी साडी राष्ट्रीय फॅशन शोमध्ये

पालयेतील कारागिरीव्यवसायाला नवचैतन्य

पणजी, दि. १० (सांस्कृतिक प्रतिनिधी)
गोव्यातील पारंपरिक कुणबी साडीने चक्क राष्ट्रीय फॅशन शोपर्यंत मजल मारल्याने बाबूराव बाबाजी तिळवे ऊर्फ ‘काका’ यांच्या व्यवसायाला नवचैतन्य मिळण्याची शक्यता आहे. या साडीची निर्मिती करणारे पेडणे तालुक्यातील पालये या गावातील ७३ वर्षीय ‘काका’ हे एकमेव कारागिर आहेत. गेली कित्येक वर्षे हातमागावर ते या साडीचे कापड तयार करत असून बदलत्या काळात या कापडाचा वापर कमी झाल्याने या कामाला मरगळ आली होती. नोव्हेंबर २०१० मध्ये व्हील्स लाईफ स्टाईल इंडिया फॅशन डिझायनर वेंडल रॉड्रीगीस यंानी पहिल्यांदाच कुणबी साडीचे प्रदर्शन केले. त्यामुळे या कापडाचे पुनरुज्जीवन होऊन काम करताना थरथरणारे काकांचे हात पुनःश्‍च जोर धरणार आहेत.
राज्यात या साडीचा वापर करण्यासाठी कुणीही महिला पुढे येत नसल्याने आता कुणबी साडीची कल्पना काळाच्या पडद्याआड जाणार की काय अशी भीती निर्माण होत असतानाच ही साडीने राष्ट्रीय फॅशन शोपर्यत पोहोचल्याने कुणबी साडीचा प्रसार आणि प्रचार पुन्हा वाढणार आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत. व्हील्स लाईफ स्टाईल इंडिया विकमध्ये कुणबी साडीने गोव्याचे प्रतिनिधित्व केले. आता मुंबईस्थित कापड डिझायनर ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी कुणबी साडीचा वापर करणार आहेत. गोव्याचे प्रख्यात फॅशन डीझायनर श्री. रॉड्रीगीस हे कुणबी साडीचे मार्केट करण्यासाठी आपल्याला पाठिंबा देणार असल्याचे मुंबईच्या कापड डिझायनर पूनम पंडित यांनी सांगितले. राज्यात कुणबी साडीला आता उतरती कळा लागली असल्याने त्याचे विणकाम करणार्‍या कारागिरांवर परिणाम झाला असल्याचे श्रीमती पंडित म्हणाल्या. राज्यात या साड्यांचा वापर कुणबी आणि गावडा समाजातील महिला करत होत्या. परंतु आधुनिक काळात या साड्यांचा वापर कमी झाल्याने हा व्यवसाय लोप पावत चालला आहे अशी चिन्हे दिसू लागली.
आता मात्र या साडीला पुनरुज्जीवन प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागल्याने कुणबी साडी, कपड्यांव्यतिरिक्त पूर्वापर कार्यरत असलेल्या नऊवारी साडी, पंचा
धोती यावर भर देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. ही साडी पूर्वीप्रमाणेच परिधान करण्यात येणार असून डाव्या खांद्यावर गाठ असणार आहे. ही साडी तयार करण्यासाठी स्वयंम सेवा गटांना डॉबी लुम्स लाकडी फ्रेम उपलब्ध करून देणार येणार असल्याचे श्रीमती पंडित यांनी सांगितले. कापड विणकाम गोव्यातून लुप्त होत झाले आहे त्यामुळे या कलेमध्ये प्रशिक्षणाद्वारे सहा ते आठ महिन्यांमध्ये महिलांना कौशल्य प्राप्त करून दिले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

No comments: