Wednesday, 9 March 2011
द्रमुक-कॉंग्रेस पेच संपुष्टात
तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून कॉंग्रेस व दमुक यांच्यात निर्माण झालेला पेच मंगळवारी अखेरीस संपुष्टात आला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ६३ जागा कॉंग्रेसला देण्यास द्रमुकने संमती दर्शवल्याने तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांत सुरू असलेला पेच सुटला. तामिळनाडूत १३ एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दमुक व कॉंग्रेस यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू होती. कॉंग्रेसने ६३ जागांचा आग्रह धरला होता तर द्रमुक ६० जागांवर अडून बसली होती. त्यावरून दोन्ही पक्षांत बेबनाव झाला. अखेरीस दमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी शनिवारी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेत कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या निर्णयामुळे कॉंग्रेस नरमाईची भूमिका घेईल ही दमुकची अटकळ मात्र सपशेल फोल ठरली. त्यानंतर द्रमुकने कॉंग्रेसशी पुन्हा चर्चेची तयारी दर्शवली. त्यादृष्टीने सोमवारी रात्री संरक्षणराज्यमंत्री पलानिमनिक्कम यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र, त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. मंगळवारी दयानिधी मारन व एम. के. अळागिरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी दोनदा चर्चा केली. सोनिया गांधींचे विश्वासू सहकारी अहमद पटेल हेही या चर्चेला उपस्थित होते. अखेरीस द्रमुकने नमते घेत कॉंग्रेसची ६३ जागांची अट मान्य केल्याने तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांत सुरू असलेला पेच सुटला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment