Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 9 March 2011

पणजीच्या भवितव्यासाठी ‘पणजी फर्स्ट’ हाच पर्याय

‘फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’चे मतदारांना आवाहन
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेला गेल्या पाच वर्षांत लागलेले भ्रष्ट व निष्क्रिय प्रशासनाचे ग्रहण दूर करण्यासाठी स्वच्छ आणि प्रामाणिक उमेदवारांना निवडून आणण्याची गरज आहे. येत्या १३ मार्च रोजी पणजीवासीयांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे व संपूर्ण गोव्यासमोर एक नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन ‘फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’ यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत उतरलेल्या ‘पणजी फर्स्ट’ पॅनल हाच योग्य पर्याय आहे व सर्वांनी या पॅनलच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, अशी विनंती डॉ. रूफीन मोंतेरो यांनी केली आहे.
आज पणजीतील पत्रपरिषदेत ते बोलत होते. ‘फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’ या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र झालेल्या शहरातील काही प्रतिष्ठित वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलला आपली पसंती जाहीर करून या पॅनलातील स्वच्छ व प्रामाणिक उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. अभिजित सडेकर, डॉ. गोविंद कामत, डॉ. विनयकुमार रायकर, डॉ. पुंडलिक पै काकोडे, डॉ. शेटये, डॉ. महेंद्र कुडचडकर, डॉ. श्याम भांडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पणजी फर्स्टच्या प्रचारासाठी विविध प्रभागांतील लोकांच्या गाठीभेटी घेणे, तसेच पणजीसमोरील विविध समस्यांबाबत मतदारांना अवगत करून या समस्या सोडवण्यासाठी योग्य लोकांची निवड करण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सरकारात असूनही पणजीसाठी काहीच कसे केले नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला. पुढील पाच वर्षांत अमुकतमुक विकासकामे करण्याची आश्‍वासने ते लोकांना देत आहेत. त्यावर कसा काय विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍नही करण्यात आला. पणजी महापालिकेत घडलेला पार्किंग घोटाळा, बाजार संकुलातील गाळे वाटप घोटाळा याचबरोबर कचरा समस्या, स्वच्छतेचा बोजवारा, गटार व्यवस्थेचे तीन तेरा आदी अनेक प्रश्‍न पणजीसमोर असताना ते सोडवण्याचे कोणतेच प्रयत्न बाबूश यांनी केले नाहीत, असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. सत्ताधारी मंडळातील एकही सदस्य या प्रकाराबाबत तोंड उघडत नसल्याचे पणजीवासीयांनी पाहिले आहे. त्यामुळे केवळ हुजरेगिरी करणारे लोकप्रतिनिधी नको आहेत, असेही डॉ. मोंतेरो म्हणाले.
भाजप सरकारच्या राजवटीत मनोहर पर्रीकर यांनी पणजीसाठी विविध विकासकामे राबवली. पर्रीकरांची राजवट गेल्यानंतर विद्यमान सरकारकडून शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. माजी महापौर अशोक नाईक हे एक स्वच्छ व कर्तबगार नेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालील ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच पणजीवासीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकेल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महापालिकेला स्थिर प्रशासन मिळण्यासाठी एकाच पॅनलकडे सत्ता देणे गरजेचे आहे अन्यथा महापालिकेत घोडेबाजाराला ऊत येईल. ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणल्यास आपली संघटना या पॅनलच्या कारभारावर नजर ठेवेल व पणजीच्या विकासात प्रत्यक्ष सर्वांना सहभागी करूनच निर्णय घेतले जातील. सत्ता व पैशांचा वापर करून मतदारांना आमिषे दाखवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विविध वस्तूंचे वाटप करणे तसेच काही ठिकाणी बळाचाही वापर होतो आहे. या सर्व गोष्टींना येत्या १३ रोजी मतदानाव्दारे योग्य ते उत्तर देण्याची जबाबदारी पणजीवासीयांची आहे, असेही ते म्हणाले. पणजीत सुशिक्षित व जागृत मतदार आहेत. लोकशाही पद्धतीत मतदान हीच खरी जनतेची ताकद आहे. या गोष्टीचा प्रत्यय या निवडणुकीत नक्कीच येईल, असा विश्‍वास त्यांनी बोलून दाखवला.
बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनलतर्फे जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू असा टोलाही यावेळी हाणण्यात आला. गेल्या २००६ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत दिलेली आश्‍वासने या पॅनलला पूर्ण करण्यात पूर्ण अपयश आले. आता पुढील कार्यकाळात या लोकांकडून काहीच वेगळे घडण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे यावेळी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणून महापालिकेत बदल घडवून आणणे हेच पणजीच्या हिताचे ठरेल, असेही ते म्हणाले.

1 comment:

Bal Kantak said...

Vicharpurvak Matdan Kara
Sevabhavi Umedvaranach Nivdun Aana.