Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 10 March 2011

स्पर्धेसाठी नव्हे ज्ञानासाठी शिका - केंकरे


कला संस्कृतीतर्फे ‘कसे शिकावे’ व्याख्यान


पणजी, दि. ९ (विशेष प्रतिनिधी)
परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी, एखाद्या पारितोषिकावर डोळा ठेवून अथवा आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या इराद्याने नको तर फक्त ज्ञानासाठी शिका. स्पर्धा करायची असेल तर ती स्वतःच्या कुवतीशी करा म्हणजे तुम्ही अधिक झळाळून उठाल, असा बहुमूल्य सल्ला न्यू मेक्सिकोे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्राचे विख्यात प्राध्यापक व्ही. एम. केंकरे (आयआयटीएन) यांनी आज विद्यार्थ्यांना दिला.कला आणि संस्कृती संचालनालयाने आयोजित केलेल्या स्व. भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी समारोहातील ‘कसे शिकावे’ या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजनांना मान हा दिलाच पाहिजे परंतु सगळ्यात उत्तम शिक्षक स्वतःमध्येच असतो. तोच यशाचे शिखर गाठण्यासाठी खरे मार्गदर्शन करू शकतो असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले ‘जे काही शिकायचे आहे त्यावर आत्मकेंद्रित व्हा. अगदी स्वतःला त्यात झोकून द्या. महाभारतातील अजुर्नाप्रमाणे लक्ष केंद्रित करा, कारण यशाची गुरुकिल्ली यातच असते. सभागृहातील प्रेक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले ‘स्वतः भोवतीच्या वातावरणात बरेच काही शिकण्यासारखे असते. अगदी आपल्या शाळेत,बाजारात, हॉटेल, मंदिरातही आपण बरेच काही शिकू शकतो. तेव्हा आपली निरीक्षणशक्ती तीक्ष्ण करा, पाहा, जाणा व शिका. हे जीवनातले शिक्षण कुठल्याही पाठ्यपुस्तकात नाही. ते स्वतःच पारखले पाहिजे, अनुभवले पाहिजे. त्या त्या क्षेत्रात पारंगत असलेल्यांकडून जरूर शिका, परंतु एखाद्या विद्येत कुशल नसलेल्यांचेही निरीक्षण करा म्हणजे स्वतः काय करू नये तेही समजेल. असे श्री. केंकरे यांनी सांगितले.
पीपल्स हायस्कूल व धेंपे महाविद्यालय पणजी येथे शिक्षण घेतलेल्या केंकरेचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले. आपल्या गोवा भेटीतील काही किस्से सांगताना ते म्हणाले ‘माझी मातृभाषा कोकणी आहे व मला तिचा सार्थ अभिमान आहे. परंतु मला अत्यंत शरम वाटते की गोव्यात येऊन तुम्हा सगळ्या गोवेकरांना मला अस्खलित इंग्रजीतून व्याख्यान द्यावे लागते. गोव्यातील माझ्या वास्तव्यात ज्या कोणाशी मी कोकणीतून संवाद साधण्याचा प्रयत्न त्या त्या त्या माणसाने माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला याचे मला फार दुःख झाले. स्वतःची मातृभाषा ही जगात सगळ्यात सुंदर असा सार्थ अभिमान फ्रेंच लोकांत आहे, मग गोवेकरांनी तसे का मानू नये’ असा सवालही त्यांनी केला. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे, मात्र त्या नंतरचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यास त्याचे बरेच फायदे असतात असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
एखादी नवीन भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतून संवाद करायला शिका. एकेक शब्द, वाक्य जोडायला शिका आणि मग लेखी भाषेकडे वळा, असा सल्लाही त्यांनी दिला. आपण जे काय शिकतो ते दुसर्‍यांना समजावून सांगितल्यास किंवा त्यावर चर्चा केल्यास ज्ञानात अधिक वृद्धी होते असेही ते म्हणाले. अभ्यास मुकाट्याने पाठांतर करण्यापेक्षा अवघड गोष्टींचा मेळ एखाद्या सहज सुलभ कथेत गुंफून अभ्यासक्रमातील मुद्दे सहज लक्षात ठेवता येतात असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले. यावेळी सभागृह भरगच्च भरलेले होते.

बॉक्स करणेे

शिकण्याबाबत गुरुमंत्र
• शिक्षणातील आनंद मिळविण्यासाठी शिका. स्वतःशीच स्पर्धा करा.
• कुणाचाही शब्द ‘ब्रह्मदेवाचा शब्द’ म्हणू नका. स्वतः तपासून पाहा. स्वतःचे पाठ्यपुस्तक तसेच शिक्षणाच्या पलीकडे जा.
• शिक्षण किंवा अभ्यास ही एक जोखीम म्हणून पाहू नका. दात ओठ खाऊन अजिबात शिकू नका. हसत खेळत, रमत गमत सहज शिका.
• झपाटल्यासारखे, एकदम झोकून देऊन शिका.
• शाळेत शिकविलेल्या गोष्टी /तत्त्वे प्रयोगात आणून पाहा. अर्थात शिकविले गेलेले आचरणात आणा.
• शिकविले जाणारे समजून, उमजून घ्या. उलटे सुलटे प्रश्‍न विचारा, चिकित्सक बना. एखाद्या बिबट्याप्रमाणे अभ्यासावर झडप घाला.
• स्वतःला असलेल्या ज्ञानाबद्दल आग्रही रहा, परंतु विनयशिलता सोडू नका. विद्या विनयेन शोभते.
• शिक्षकांना मान द्याच पण स्वतःचे गुरूही बना.

No comments: