Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 7 March 2011

द्रमुकचे मंत्री आज राजीनामा देणार

चर्चेस कॉंग्रेस अनुत्सुक

चेन्नई, दि. ६
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना झालेल्या मतभेदांमुळे केंद्रात सत्तारुढ असलेल्या संपुआतून बाहेर पडण्याची घोषणा शनिवारी रात्री केल्यानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळातील द्रमुकचे सदस्य उद्या आपला राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, द्रमुकच्या निर्णयावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता, आणखी चर्चा करण्यासही कॉंग्रेस उत्सुक नसल्याचे संकेत मिळत आहेत.
‘आमच्या पक्षाचे मंत्री राजीनामा सादर करण्यासाठी उद्या दिल्लीला जातील,’ असे द्रमुकचे वरिष्ठ नेते व लोकसभा सदस्य टी. आर. बालू यांनी आज येथील पक्ष मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. एम. के. अलागिरी व दयानिधी मारन यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात द्रमुकचे सहा सदस्य आहेत. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यापासून आतापर्यंत कॉंग्रेसच्या कुठल्याही नेत्याने द्रमुकशी संपर्क साधलेला नाही, असेही बालू यांनी यावेळी सांगितले.
१३ एप्रिल रोजी तामिळनाडूत होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपात आपल्याला ६३ जागा मिळाव्या, असा हट्ट कॉंग्रेसने धरला होता. कॉंग्रेसच्या या हटवादी भूमिकेमुळे नाराज झालेल्या द्रमुकने संपुआ सरकारचा पाठिंबा काढण्यासह मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय शनिवारी रात्री घेतला होता. मात्र, सरकारला यापुढेही मुद्यांवर आधारित पाठिंबा देणार असल्याचेही जाहीर केले होते.

No comments: