Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 11 March 2011

ताळगावातील ‘कॉंक्रीट’ची जंगले कुणाची?


पुरोगामी शेतकरी संघाचा खडा सवाल

• सामान्यांना देशोधडीला लावण्याचा चंग


पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
ताळगावातील गरीब, कष्टकरी व शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणार्‍या लोकांना देशोधडीला लावण्याचा चंगच इथल्या लोकप्रतिनिधीने बांधला आहे. बिल्डर लॉबीशी लागेबांधे साधून शेतजमिनींचे बिगरशेतांत रूपांतर करून कॉंक्रीटची जंगले उभारण्यात येत आहेत. या गरीब जनतेच्या जमिनी हडप करून या लोकांना आपल्या दारांत भीक मागायला लावण्याचा निष्ठुरपणा करणार्‍या नेत्यांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवताना ताळगाव व पणजीवासीयांनी हजारवेळा विचार करावा, असे कळकळीचे आवाहन ताळगाव पुरोगामी शेतकरी संघाने केला आहे.
आज (दि.१०) इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष झेवियर आल्मेदा यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी संघाचे सचिव ज्योकीम डिसोझा, खजिनदार कँडिडो डायस, पुंडलीक रायकर व अखिल गोवा कूळ व मुंडकार संघटनेचे सचिव राजीव नाईक हजर होते. ताळगावातील विविध शेतजमिनीत उभी होणारी बांधकामे व पर्यावरण संरक्षणाच्या कायद्यांची उघडपणे होणारी पायमल्ली याबाबत उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरण व मुख्य सचिव यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. हे प्रकार ताबडतोब थांबवले नाहीत तर पुढील परिणामांना संबंधित अधिकारीच जबाबदार ठरतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ताळगावात भलेमोठे रस्ते शेतातून तयार करण्यात आले आहेत. हे रस्ते इथल्या सामान्य जनतेसाठी की बिल्डरांच्या भल्यासाठी हे लोकांनी तपासून पाहावे. इथल्या शेतजमिनी बुजवून व शेतातील पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याच्या मार्गावर मातीचे भराव टाकून संपूर्ण शेतीच उद्ध्वस्त करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारांमुळे पर्यावरणीय समतोलच बिघडला असून विविध ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. या डबक्यांत साचणार्‍या पाण्यामुळे रोगराईचाही फैलाव होत असून डासांची पैदास वाढल्याने या भागांत मलेरिया सारखे रोग पसरत चालले आहेत. या एकूण प्रकाराकडे नगर नियोजन खाते व नियोजन विकास प्राधिकरणाचे कोणतेही लक्ष नसल्याने या बेकायदा कृत्यांना तेच जबाबदार ठरतात, असा ठपकाही श्री. आल्मेदा यांनी ठेवला. अलीकडेच सर्वे क्रमांक १०५/१ व १०६/१ याठिकाणी नवीन व्यापारी संकुल उभे राहत आहे. या भागातील शेतातील निचरा सांतइनेज नाल्यात जाण्याचा हा मार्ग असून तो बंद झाला तर या भागातील संपूर्ण शेती नष्ट होईल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.याठिकाणी सुमारे १५० एकर जमिनीत शेती करणारे शेतकरी उघड्यावर पडणार असून ही भरपाई अजिबात भरून येणारी नाही, असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. बाबूश मोन्सेरात यांच्या बंगल्याभोवतीचा भाग म्हणजेच ताळगाव असा आभास निर्माण केला जात असला तरी ताळगाव हा भाग अनेक टेकड्या व मच्छीमार वसाहतीने भरला आहे. या भागांत अनुसूचित जमाती व मच्छीमार बांधव राहतात. त्यांचे जीवनमान अजूनही सुधारलेले नाही. या लोकांसाठी काहीही न करता इथे भले मोठे रहिवासी प्रकल्प व व्यापारी संकुले उभारून या लोकांचे जगणेच हैराण करण्याचा डाव आखण्यात आला आहे.
ताळगाव पंचायत क्षेत्र ‘ओडीपी’ क्षेत्रात येत असल्याचे सांगून प्रादेशिक आराखडा २०२१ च्या रचनेत इथल्या लोकांची मते जाणून घेतली नाहीत. या ‘ओडीपी’ आराखड्यात शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात रूपांतर करण्यात येत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. याप्रकरणी ताळगाव पंचायत तथा संबंधित सरकारी खात्यांच्या कारभाराचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

No comments: