वास्को, दि. ९ (प्रतिनिधी)
मंगोरहिल येथील अभिजित सरकार यांच्या घरातील १ लाख ९७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. श्री. सरकार हे आपल्या कुटुंबासह१५ दिवसांसाठी गोव्याबाहेर गेले होते. ते आज (दि.९) सकाळी घरी परतले असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. ‘जुलीयेटा इमारतीतील’ दुसर्या मजल्यावर राहणार्या अभिजित यांच्या मुख्य दरवाजाचे विशिष्ट वस्तूने चोरट्यांनी कुरुप उघडून घरातील १ लाख ९७ हजारांचे सोन्याचे ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. याबाबत कुठल्याच प्रकारचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही.
आज सकाळी आठ वाजता सदर प्रकार उघडकीस आला. श्री. सरकार हे दि. २३ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह भोपाळ येथे गेले होते. आज सकाळी ते परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे कळले. वास्को पोलिसांना सदर प्रकाराची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी पाहणी करताच घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप चोरट्यांनी विशिष्ट वस्तूचा वापर करून उघडल्याचे समजले.
पोलिसांच्या माहितीनुसार सदर चोरट्यांनी सरकार यांच्या फ्लॅटमधील खोलीतील कपाटाचा दरवाजा तेथे ठेवलेल्या चावीने उघडून आतील सोन्याचे ऐवज लंपास केले. यात चार सोन्याच्या बांगड्या, तीन सोन्याचे कानातील दागिने, दोन सोनसाखळ्या व इतर सोन्याचे ऐवज मिळून १ लाख ९७ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव नाईक पुढील तपास करीत आहेत.
Thursday, 10 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment