फोंडा, दि. ८ (प्रतिनिधी)
बारावीच्या परीक्षेच्या ताणामुळे दुर्गाभाट फोंडा येथील एक विद्यार्थिनी कु. सयामी श्याम पंडित (१७) हिने राहत्या घरात गळफास लावून आज (दि.८) सकाळी आत्महत्या केली.
राज्यातील बारावीच्या परीक्षेला काल सोमवार ७ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कु. सयामी हिने सोमवारी पहिला पेपर लिहिला होता. हा पेपर कठीण गेल्याने ‘ती’ मानसिक तणावाखाली होती. तिने त्याच तणावातून आत्महत्या केल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. तिचे वडील व्यावसायिक आहेत आणि आई शिक्षिका आहे. कु. सयामी ही कवळे येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवार ८ रोजी सकाळी तिचे आई आणि वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यानंतर सयामी हिने राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ८.३० च्या सुमारास शेजार्याला खिडकीतून कु. सयामी ही पंख्याला लटकत असल्याचे आढळून आले. त्यानंतर फोंडा पोलिसांना माहिती देण्यात आली. कु. सयामी हिच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयाच्या जबान्या नोंदवून घेतल्या असून परीक्षेचा पेपर कठीण गेल्यामुळे तणावाखाली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर यांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर सयामीचे पार्थिव नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
Wednesday, 9 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment