महामार्गावरील रोजचीच वाहतूक कोंडी भयावह
कुळे, दि. १० (प्रतिनिधी): बरकटे मोले येथे राष्ट्रीय महामार्गाच्या वळणावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मारुती ओम्नी व टाटा २०६ यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण टकरीत मारुती व्हॅनमधील चालकासह चौघे देशी पर्यटक गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. उसगाव तिस्क ते धारबांदोडा या महामार्गावरील वाहतूक कोंडीत सुमारे दोन तास अडकून राहिल्याचा असा जबरदस्त फटका या पर्यटकांना बसला.
कुळे पोलिस स्थानकातील १०८ रुग्णवाहिका मोले ते उसगाव तिस्कच्या वाहतूक कोंडीत अडकून राहिल्याने जखमींना सुमारे पाऊण तास घटनास्थळी तळमळत रहावे लागले. जखमींना अखेर कुळे पोलिस स्थानकाच्या रॉबर्ट १०० व सुमो वाहनाने फोंडा आयडीसी इस्पितळात दाखल करण्यात आले.
नागपूरहून आलेले हे चौघे पर्यटक बागा बीचवरून मारुती व्हॅन क्र. जीएˆ०३, टी ५९२० मधून कुळे येथे दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येत होते. त्याचवेळी जुवारीनगर वास्को येथील टाटा २०६ ट्रक क्र. जीएˆ०६, पी ४१६९ लोंढामार्गे वास्कोकडे जात असताना बरकटे येथे त्यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर एवढी जबर होती की, व्हॅनचा चुराडा होऊन तिचे तोंड विरुद्ध दिशेला झाले. यात व्हॅनचालक विदेश आत अडकून पडला. चालकाच्या बाजूला बसलेल्या अजिंक्य सराफचे दोन्ही पाय मोडले आहेत. विशेष गोती, देवनाथ लिखिते व सांतानो गोमकाळे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आमच्या मोले वार्ताहराने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा सर्व जखमी मदतीसाठी याचना करीत असल्याचे करुण दृश्य नजरेस पडले. त्यांनी १०८ सेवेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तथापि, १०८ सेवेचे वाहन वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. नंतर कुळे पोलिस स्थानकाला अपघाताची माहिती देण्यात आली. व्हॅनचालक विदेश हा सुमारे पाऊण तास व्हॅनमध्ये अडकून पडला. नंतर लोकांनी मदत करून त्याला बाहेर काढले. बाकीचे पर्यटक मदतीची याचना करत कण्हत होते. व्हॅनचालक विदेश यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फोंडामार्गे येताना ते उसगाव तिस्क ते धारबांदोडा या महामार्गावरील वाहतूक कोंडीत सुमारे दोन तास अडकले. कुळे येथे लवकर पोहचण्याच्या नादात तसेच वाहतुकीत अडकून राहिल्याने तणावामुळे व पावसामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला.
पोलिसांकडे नेहमीप्रमाणे स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने जखमींना गाडीमध्ये घालताना त्यांना बरीच कसरत करावी लागली. दाभाळ ते सावर्डे व मोले ते उसगाव तिस्क या मार्गावर होणारी वाहतूकीची कोंडी स्थानिकांच्या जीवावर बेतली असून या भागातील लोकांच्या सुरक्षतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुळे पोलीस स्थानकात १०८ रुग्णवाहिका असली तरी तिचा फायदा मोक्याच्या वेळी जखमींना होत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे गेल्या आठवड्यात दुधसागर धबधब्यावर मुंबईचा एक विद्यार्थी बुडाला होता. त्याला स्थानिकांनी शिताफीने पाण्यातून वर काढून दुधसागरहून सुमारे सोळा किलोमीटरवर कुळेपर्यंत आणले होते. मात्र १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने व सुमारे पंधरा मिनीटे उशिर झाल्याने नंतर वाटेतच त्याचे निधन झाले होते.
सततची वाहतूक कोंडी, कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसणे यामुळे एखादा रुग्ण किंवा अपघातातील जखमी व्यक्तीला वेळेवर उपचार मिळतील याची खात्री देणेच कठीण बनले आहे. साहजिकच असुरक्षितेच्या भावनेतून येथील लोक सरकारच्या नावाने बोटे मोडत दिवस कंठत आहेत.
Saturday, 11 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment