राजकीय दडपणामुळे कारवाई रखडली
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): ‘डी. जी. शिपिंग’कडे व्यापार परवाना नसताना कोणाचीच तमा न बाळगता मांडवीत निर्धास्तपणे कॅसिनो व्यवहार चालू ठेवलेल्या ‘कॅसिनो रॉयल’ या जहाजावर कारवाई करण्यावरून प्रशासकीय पातळीवर प्रचंड हतबलता पसरली आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी १९ डिसेंबरपूर्वी अनधिकृत कॅसिनो जहाजे मांडवीतून हटवण्याचा कडक इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राजकीय दडपणामुळे ती रखडल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
मांडवी नदीतील ‘कॅसिनो रॉयल’ या जहाजाला अजूनही ‘डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग’कडून व्यापार परवाना मिळोलला नाही. ‘डीजी शिपिंग’ चे संयुक्त संचालक गिरीधरीलाल सिंग यांनी यासंबंधी बंदर कप्तान खात्याला कारवाई करण्याबाबत नोटीसही बजावली आहे. बंदर कप्तान कार्यालय व गृह खाते मात्र प्रत्यक्ष कारवाईवरून टोलवाटोलवी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता मांडवीत तीन जहाजांना ‘डी. जी. शिपिंग’चा परवाना नसल्याचे म्हटले जाते व त्याबाबतची ‘फाईल’ आपण मागवल्याची माहिती त्यांनी दिली.
एका ‘भू कॅसिनो’ ला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यास आपण आजच मान्यता दिली; पण या कॅसिनोचे नाव नक्की आठवत नाही, असेही ते म्हणाले. आज राजभवनवर नौदलध्वज दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्यात ते व्यस्त राहिल्याने सविस्तर माहिती त्यांना देता आली नाही.
दरम्यान, ‘कॅसिनो रॉयल’ या कंपनीचे सरकारातील अनेक सत्ताधारी नेत्यांशी ‘घरोब्या’चे संबंध आहेत. ‘डी. जी. शिपिंग’चा व्यापार परवाना व खुद्द बंदर कप्तान खात्याकडून मांडवीत जलसफरीचा परवाना नसतानाही ही कंपनी सर्वांच्या नाकावर टिच्चून गोव्यात बिनधास्त कॅसिनो चालवत आहे. या प्रकरणाची पूर्ण जाणीव असूनही सरकार कारवाई करण्यास धजत नाही, त्याअर्थी यात मोठ्या प्रमाणात छुपा व्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. गृह खात्याकडे याबाबत चौकशी केली त्यांच्याकडून मुख्य सचिव व कायदा सचिवांकडे बोट दाखवले जाते.
विरोधी भाजपने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. ही कॅसिनो जहाजे मांडवीतून हटवण्यासाठी १९ डिसेंबरपर्यंतची मुदत भाजपने दिल्यामुळे सचिवालयात उच्च स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली.
Wednesday, 8 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment