वास्को, दि. १० (प्रतिनिधी): ‘टाईमबॉंब’ वर असलेल्या वास्को शहरातील वाहतूक रोखून अग्निशामक दलाचे सर्व बंब इंडियन ऑईलच्या दिशेने सायरन वाजवत पळत असल्याचे दृश्य आज संध्याकाळी दिसून येताच येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. तथापि, दीड तासानंतर, शहरात कुठल्याच प्रकारची भयंकर घटना घडलेली नसून हा पूर्ण प्रकार आपत्कालीन सराव (मॉक ड्रिल) असल्याचे लोकांना कळताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला..
आज संध्याकाळी पाचच्या सुमारास शहरातील एफ.एल गोम्स मार्ग, स्वतंत्र पथ, सडा भागात जाणारा रस्ता, बायणा जाणारा रस्ता अशा विविध ठिकाणी पोलिस व वाहतूक पोलिसांनी उपस्थिती लावून सर्व मार्ग बंद केले. त्यामुळे मोठाच पेच निर्माण झाला. नंतर वास्को कदंब बसस्थानकासमोरील अग्निशामक दलाच्या कार्यालयातून अग्निशामक बंब ‘भोंगा’ वाजवत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या तेल टाक्यांच्या दिशेने जात असल्याचे दिसताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. यानंतर काही क्षणात १०८ रुग्णवाहिकेबरोबर मुरगाव तालुक्यात असलेल्या इतर अनेक रुग्णवाहिका, वास्को पोलिसांची वाहने इत्यादी आयओसीच्या बाजूने जात असल्याचे सर्वांना दिसून येताच तेथे आग तर लागली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली.
वास्को व मुरगाव पोलिसांनी तेव्हाच लोकांना आयओसीच्या टाक्यांपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली व नंतर सर्व तेल टाक्यांवर दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली.
शहरात येणारे बहुतेक रस्ते अडविण्यात आल्याने सर्वत्र वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली.
साडेसहाच्या सुमारास हा पूर्ण प्रकार म्हणजे ‘मॉकड्रिल’ असल्याचे कळताच जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला.
संध्याकाळी पाच ही वेळ कामावरून घरी परतण्याची असते व अशा वेळी सदर ‘मॉकड्रिल’ घेणे जीवघेणे ठरू शकते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. दरम्यान मुरगाव तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापन सेवा समितीचे अध्यक्ष तथा मुरगावचे उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.
अधिक माहितीसाठी अग्निशामक दल, वास्को व मुरगाव पोलिस आदी यंत्रणांच्या अधिकार्यांनीही मौन बाळगणेच पसंत केले.
यंत्रणांना पूर्वकल्पना होती!
आज संध्याकाळी झालेल्या या ‘मॉकड्रिल’ची माहिती बहुतेक यंत्रणांच्या अधिकार्यांना पूर्वीच होती, असे सूत्रांकडून समजले.
उपलब्ध माहितीनुसार अग्निशामक दलाला संध्याकाळी ‘मॉकड्रिल’ होणार हे पूर्वीच कळल्याने त्यांनी याची पूर्वतयारी केली होती. तसेच सुट्टीवर असलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांना यासाठी कामावर बोलवण्यात आले होते.
Saturday, 11 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment