‘तेजोनिधी’ सोहळ्यात गौरव
पणजी,दि.४ (प्रतिनिधी): स्वहितापेक्षा समाज व देशहिताचा विचार करून देशभक्तांची फौज निर्माण करतानाच प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अहोरात्र झटणारे प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर हे एक चालते बोलते विद्यापीठ आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व दापोली येथील सावित्रीबाई फुले शिक्षणसंस्थेचे संस्थापक भिकू रामजी इदाते यांनी आज पर्वरी येथे केले.
विद्याप्रबोधिनी शिक्षण संस्थेतर्फे संस्थेच्या आवारात शिक्षक, पालक व आजी - माजी विद्यार्थीवर्गातर्फे प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचा आज डॉ. सदाशिव देव यांच्या हस्ते शाल, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने श्री. इदाते बोलत होते. व्यासपीठावर सौ. सुषमा वेलिंगकर, ‘तेजोनिधी’चे निमंत्रक ज्ञानेश्वर पेडणेकर, विद्याप्रबोधिनी संस्थाध्यक्ष प्रभाकर भाटे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दामोदर म्हार्दोळकर, एल.डी.सामंत हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नीता साळुंखे व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दीपक गाड उपस्थित होते.
श्री. इदाते म्हणाले, सुभाष वेलिंगकर हे वीरवृत्तीचे चैतन्यमयी व देशप्रेमी व्यक्तिमत्त्व असून देशहिताशिवाय त्यांनी दुसरा कसलाच विचार आयुष्यात केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करताना संघाच्या प्रार्थनेतील देशहिताचा प्रत्येक शब्द सत्यात उरण्यासाठी कार्य करणारे वेलिंगकर एक आदर्श व देशहिताकारी क्रांतीवीरच आहेत.
त्यांनी गोव्यात संघ वाढावा म्हणून अथक प्रयत्न केले.
प्रसिद्ध संशोधक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. देव म्हणाले, गोव्याच्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे प्रा. वेलिंगकर हे एक तेजःपुंज, संस्कारमय व सर्वसमावेशक नेते आहेत. तुरुंगवास भोगूनही न डगमगता त्यांनी समाजकार्य सुरूच ठेवले.
गौरवाला उत्तर देताना प्रा. वेलिंगकर म्हणाले, आपण मतभिन्नता असलेल्या लोकांबरोबरही कामे केले. तुमचे विचार जर सुस्पष्ट आणि सत्य असतील तर तुमच्या कार्याला सर्वांचा हातभार लागतो. समाजात सकारात्मक बदल घडण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि याकामी आपल्या सर्वच सहकार्यांनी मोठे योगदान दिले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.
ज्ञानेश्वर पेडणेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. दिना बांदोडकर यांनी, प्रा. दत्ता भि. नाईक यांनी प्रा. वेलिंगकर यांच्यावर रचलेल्या कवितेचे गायन केले. सूत्रनिवेदन प्रा. दीपक आमोणकर यांनी केले. आभार नीता साळुंखे यांनी मानले. पसायदान डॉ. अनघा बर्वे यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांनी स्थापलेल्या विद्यार्थी मंडळाचे प्रा. वेलिंगकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच याप्रसंगी प्राचार्य वेलिंगकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा गौरवपट दाखवण्यात आला.
Sunday, 5 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment