प्रीतेश देसाई
महानंदवरील खटल्यांचे भवितव्यच धोक्यात
पणजी, दि. ६ - सीरियल किलरमहानंद नाईक याने आगशी येथे खून केलेल्या ठिकाणी मिळालेला हाडांचा सापळा हा सुशीला फातर्पेकर हिचा नसल्याचे वैद्यकीय चाचणीद्वारे उघड झाले असून त्यामुळे या खुनाच्या खटल्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
तो हाडांचा सापळा तरुणीचा नसून एका पुरुषाचा असल्याचेही वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. सध्या या खून प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. सुशीलाचा म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेला हाडांचा सापळा सुशीला हिचा नाही तर मग, महानंदने अजून दाखवलेल्या ठिकाणी मिळालेला पुरुषाचा सापळा हा कोणाचा, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे तरुणींप्रमाणेच महानंद हा पुरुषांचाही गळा घोटत होता का, याचाही तपास होणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
तपासकामात राहिलेल्या त्रुटींचा फायदा उठवत आणि ‘डीएनए’ चाचण्या नकारात्मक येऊ लागल्याने खून प्रकरणांतून तो दोषमुक्त होत चालला आहे. त्यामुळे महानंदची पुन्हा नव्याने पोलिस चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आतापर्यंत महानंद सात खून प्रकरणांत दोषमुक्त झाला आहे. त्याच्यावर आरोप असलेल्या अजून ९ प्रकरणांचा निकाल लागणे बाकी आहे.
महानंदने दाखवलेला मृतदेहाचा सापळा हा सुशीलाचा नसल्याचे स्पष्ट झाल्याने सुशीला जिवंत आहे का, असाही संशय निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी फोंडा पोलिसांनी सुशीलाच्या कुटुंबीयाची आणि मिळालेल्या हाडांच्या सापळ्याची ‘डीएनए’ चाचणी केली होती. त्यान्वये दोघांचे ‘डीएनए’ जुळत नसल्याचा अहवाल आला आहे.
Tuesday, 7 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment