सव्वा लाख चौरस मीटर जागेवर ‘एमपीटी’चा दावा
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - कासार, नावशी, बांबोळी, ओशेल या किनारी भागावर ‘एमपीटी’ने आपला अधिकार सांगत त्याठिकाणी भव्य जेटी बांधण्याच्या प्रकल्पाला येथील मच्छिमार्यांनी तीव्र विरोध केला आहे. आज सायंकाळी नावशी येथे झालेल्या बैठकीत ‘एमपीटी’च्या किंवा सरकारच्या कोणत्याही अधिकार्याला सर्वेक्षण करण्यासाठी पाय ठेवायला देणार नसल्याचा निर्णय गावातील नागरिकांनी घेतली आहे. तसेच, येत्या काही दिवसंात या प्रकल्पाला मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. स्थानिक मच्छीमारी बांधवांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचीही तयारी असल्याचे येथील जिल्हा पंच सदस्य सुरेश पालकर यांनी सांगितले.
‘एमपीटी’ने याठिकाणी भव्य जेटी उभारून जहाज बांधणी तसेच क्रूझ ठेवण्यासाठी बांधकाम करण्याचा निर्णय येथील पंचायतींना कळवला आहे. सुमारे १ लाख २४ हजार चौरस मीटर जागेवर एमपीटीने आपला अधिकार सांगितला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारी बांधवामध्ये खळबळ माजली आहे. या किनारी भागात हा प्रकल्प झाल्यास सर्व मच्छिमार्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच, पणजीत विरोध होणारी तरंगती कॅसिनो जहाजेही याठिकाणी आणून उभे करण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आज सायंकाळी नावशी या गावात झालेल्या स्थानिकांच्या बैठकीला आमदार फ्रान्सिस सिल्वेरा उपस्थित होते. त्यांनीही लोकांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, एमपीटीच्या या प्रकल्पाविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, स्थानिक पंचायतीने या प्रकल्पाच्या बांधकामाला विरोध करणारा ठराव घेतला असून विरोधकांनीही त्यावर सही केली असल्याची माहिती श्री. पालकर यांनी दिली.
मुंबई येथील ‘कर्गवाल कन्स्ट्रक्शन कंपनी’ला ३० वर्षाच्या लीझ तत्त्वावर ही जागा देण्यात आली आहे. दरमहा ४ रुपये ८० पैसे ठरवण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नावशी, कासरा येथील हातावर मोजणार्या लोकांना सरकारी नोकरी आहे. तर, गावातीलराहिलेले सर्व लोक मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे येथे जेटीचे बांधकाम झाल्यास मच्छिमार्यांना आपला व्यवसाय करता येणार नाही. त्यांच्या घरावरही संक्रांत येणार असल्याचे श्री. पालकर यांनी सांगितले. पारंपरिक मच्छिमार्यांची जागा ताब्यात घेऊन याठिकाणी तरंगत्या कॅसिनोला मार्ग मोकळा करून देण्याचा ‘एमपीटी’चा इरादा असल्याचाही आरोप यावेळी श्री. पालकर यांनी केला.
Monday, 6 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment