पोलिसांकडून अद्याप आरोपपत्रच नाही
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): ड्रग माफिया डेव्हिड ग्राहीम ऊर्फ ‘दुदू’ याच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अर्ज सादर करण्यात आला आहे. यावर गुन्हा अन्वेषण विभागाने वेळ मागून घेतला आहे. येत्या तीन आठवड्यांत याप्रकरणी उत्तर देण्याचे आदेश देत यावरील पुढील सुनावणी जानेवारी २०११ मध्ये ठेवण्यात आली आहे.
या प्रकरणी अद्याप पोलिसांनी आरोपपत्रच सादर केलेले नाही. सुमारे दहा महिन्यांपासून ‘दुदू’ तुरुंगात असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी याचना या अर्जात करण्यात आली आहे. तर, ‘दुदू’ याच्याकडे सापडलेला अमली पदार्थ चाचणीसाठी पोलिस वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल येताच आम्ही त्याच्यावर आरोपपत्र सादर करू, असे राज्य पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
पोलिसांच्या या पवित्र्याला अर्जदाराच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सदर अमली पदार्थाचा अमली पदार्थ विभागाकडे अहवाल आलेला आहे. तरीही आरोपपत्र सादर करण्यास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला.
त्यावर लेखी उत्तर देण्यासाठी पोलिसांना एका महिन्याची मुदत न्यायालयाने दिली आहे.
‘दुदू’ याने पोलिसांना दिलेल्या जबानीनंतर पोलिस खात्यात खळबळ माजली होती. त्याने अमली पदार्थ प्रकरणात तीन पोलिसांची नावे तपास अधिकार्यांसमोर उघड केली होती. त्यावरून ‘अटाला’ या ड्रग माफियाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर एका निरीक्षकासह सहा पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या सर्वांचा अमली पदार्थ व्यवहाराशी संबंध असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचेही पोलिस खात्याने सांगितले होते.
Wednesday, 8 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment